नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेत एका पोलीस निरिक्षकाने डॉक्टर ही उपाधी दिलेल्या पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणूसिंग चव्हाण यांची उचल बांगडी करून पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांना मोठी जबाबदारी देत गुरुद्वारा सुरक्षा पथकात पाठविले आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत सन 2021 पासून तोंडी आदेशावर कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण यांना पोलीस नियमावलीप्रमाणे कोणतेही अधिकार नसतांना त्यांनी भरपूर ऑपरेशन केले. त्यांच्या या ऑपरेशनमधील विशेष प्राविण्यामुळे त्यांना एका पोलीस निरिक्षकाने डॉक्टर ही उपाधी दिली होती. शल्यचिकित्सा करतांना डॉक्टरांना ज्या तंत्रज्ञाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक असते ते सर्व ज्ञान यांच्याकडे होते. डॉक्टरकडे ऑपरेशन केल्यानंतर रुग्णाला बरेच काळ पलंगावरून उठता येत नाही. त्याला भरपूर काळ लागतो आणि त्यानंतर तो बरा होत असतो. पण स्थानिक गुन्हा शाखेत कोणाच्या तोंडी आदेशाने हे कार्यालयास माहित नाही तरी पण डॉक्टर तेथे कार्यरत होतेच. त्यातनूच जवळपास 37 महिने त्यांचे कार्य चालले. या कार्यात त्यांनी अनेक तक्रारी दिल्या, अनेक गुन्ह्याचे तपास केले, अनेक अर्ज चौकशी केले. त्यातून मोदकांचा प्रसाद मिळवला आणि वाटला सुध्दा बहुदा त्यामुळेच त्यांची आदेश नसतांना सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेत महत्वाची भुमिका होती.
मागील पंधरा दिवसांपासून वास्तव न्युज लाईव्हने डॉक्टरची एक्झीट व्हावी यासाठी बऱ्याच बातम्या प्रसिध्द केल्या. त्या सुध्दा सत्यच आणि त्यातून अखेर डॉक्टरांची एक्झीट झालीच. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महात्मा गांधी जयंती दिनी त्यांना एलसीबीतून एक्झीट मिळाली आणि सध्या ते वजिराबाद पोलीस ठाण्यातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या जीपीयु(गुरुद्वार सुरक्षा पथक) येथे कार्यरत झाले आहेत.
जरी डॉक्टर साहेब जीपीयुमध्ये गेले असले तरी त्या ठिकाणी त्यांनी आपले ऑपरेशन थेटर सुरू करू नये तरच कमावले. कारण जीपीयुच्या कार्यालयात बहुदा सर्वसामान्य माणसांची येण्या-जाण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे येथे बसून सुध्दा ऑपरेशन होवू शकतात. याबाबीला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.