शेतात गांजा पिकविणारे तीन जण पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-डोंगरगाव आणि दिग्रस ता.किनवट येथे काल पोलीसांनी गांजाची शेती पकडली. त्याप्रकरणी तिन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी किनवट यांनी एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात तीन आरोपी फरार आहेत. फरार आरोपीमध्ये डोंगरगाव येथील ईश्र्वरदास किशन हुरदुके याचाही समावेश आहे.
काल सकाळी भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक रामदास श्रीमंगले, पोलीस अंमलदार राजदिपसिंघ, पांडूरंग जिनेवार, लतिफ, स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार असे पोलीस पथक किनवट तालुक्यातील डोंगरगाव आणि दिग्रस या गावांमध्ये जातांना वेगवेगळ्या छोट-छोट्या टेकड्या ओलांडून पायी तेथे पोहचले. दुसरे एक पथक आरोपींच्या शोधात गेले. त्या ठिकाणी वेगवेगळ्या पिकांमध्ये गांजाची झाडे उगवलेली होती. अनेक शेतांची तपासणी केल्यानंतर ती गांजांची झाडे पोलीसांनी जप्त केली. वन खात्याच्या जमीनीवर कसुन पिक उगविण्यासाठी मिळालेल्या या जमीन पट्यामध्ये लोकांनी गांजाची लागवड केली. पोलीसांनी मोजलेला एकूण गांजा 496 किलो आहे. त्याची बाजारातील किंमत 24 लाख रुपये आहे. पोलीसांनी या प्रकरणी निळंकठ शेळके, विनोद हुरदुके, संजय हुरदुके या तिघांना पकडून अटक केली आहे. या प्रकरणातील इतर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये डोंगरगावचे पोलीस पाटील ईश्र्वरदास किशन हुरदुके याचाही समावेश आहे.
किनवटचे पोलीस निरिक्षक सुनिल बिर्ला आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी निळकंठ शेळके, विनोद आणि संजय हुरदुके या तिघांना किनवट न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्या तिघांना एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!