नांदेड(प्रतिनिधी)-नेरली येथील अतिसार प्रकरणात ग्रामसेवकावर जबाबदारी निश्चित करून झालेल्या विषयाला दिलेला पुर्ण विराम खऱ्या अर्थाने पुर्ण विराम नसून अर्धविराम आहे.सुदैवाने अतिसार प्रकरणात कोणाचा जिव आजपर्यंत गेला नाही. ही देवाची कृपाच म्हणावी लागेल.
शासनाच्या प्रत्येक कामामध्ये एखाद्या व्यक्तीला दिलेल्या कामाची तपासणी करणे आणि त्या कामाची क्रॉस चेकींग करणे ही एक प्रक्रिया असते. गावातच्या पाणी पुरवठा योजनेत जनतेला दिला जाणारा पाणी पुरवठा हा शुध्द असावा यासाठी दक्षता घेतली जाते. या दक्षतेमध्ये पाण्यात टाकले जाणारे ब्लिचींग पावडर हे गुणवत्तापुर्ण असावे याची आवश्यकता असते. यातील तज्ञ लोक सांगतात ज्या ब्लिचींग पावडरमध्ये 34 टक्के क्लोरिन असते ते ब्लिचींग पावडर सर्वोत्कृष्ट असते. जिल्हाभरात हजारो पाणी पुरवठ्याच्या टाक्या आहेत आणि त्यावर नियंत्रण ग्रामसेवकाचे असते हे खरे असले तरी जिल्हा परिषदेतील त्यावर लक्ष ठेवणारे इतर अधिकारी काय करत होते देव जाणे. पण आता नेरली गावात झालेल्या अतिसाराची जबाबदारी ग्रामसेवकावर ठेवून त्याला निलंबित करण्यात आले आहे. एका ग्रामसेवकाला निलंबित केल्याने हा प्रश्न सुटणार आहे काय? यापुढे इतर पाण्यांच्या टाक्यांमध्ये टाकले जाणारे ब्लिचींग पावडर आणि त्यावर लक्ष देणारी अधिकारी मंडळी यांनी योग्यरितीने काम केले नाही तर पुन्हा कुठे तरी असा अतिसाराचा प्रसंग उदभवणार नाही याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे या अतिसाराच्या प्रकरणाला दिलेला न्याय योग्य वाटत नाही.