नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या नवऱ्याला मारुन टाकण्याच्या आरोपात तुरूंगात असणाऱ्या महिलेचे 26 हजार रुपये पोलीस कोठडी दरम्यान काढून घेतल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी ते पैसे अंगझडतीत मिळाले असे नंतर कोर्टाला सांगितले. बाईच्या तक्रारीची दखल न्यायालयाने घेतली असून त्यात बाईच्या मारहाण आरोपातील पोलीस ओळखता यावेत म्हणून न्यायालयाने पोलीसांचे फोटो मागविले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 351(2), 351(3) 352 प्रमाणे खूनाचा गुन्हा क्रमांक 730/2024 दाखल झाला होता. एफआयआरमधील आरोपाप्रमाणे आपल्या नवऱ्याचा खून त्या बाईने केला होता. त्याच्यासोबत एक साथीदार होता. त्या साथीदाराला पुढे न्यायालयाने अटकपुर्व जामीन दिला आहे.
प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार आपल्या नवऱ्याच्या खून करणाऱ्या पत्नीला पहिल्यांदा पोलीस कोठडी मिळाली तेंव्हा तिने कोणताही मारहाणीचा आरोप पोलीसांवर केला नाही. त्यानंतर मात्र पीसीआर वाढवून देण्यासाठी पोलीस विनंती करत असतांना न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठविले. पण त्यावेळेस त्या महिलेने माझ्या पीसीआर काळात नांदेड ग्रामीण पोलीसांनी मला भरपूर मारहाण केली आणि माझ्याकडील 26 हजार रुपये काढून घेतले. पैसे आम्ही तुला परत देणार आहोत असे सांगत होते. परंतू पैसे दिले नाहीत. न्यायालयाने या बाबत विचारणा केली असता पोलीसांनीनंतर सांगितले की, महिलेच्या अंगझडतीत ते पैसे जप्त केले आहेत. त्याच दिवशी न्यायालयाने त्या महिलेचा इन कॅमेरा जबाब नोंदवून घेतला आणि महिलेला वैद्यकीय तपासासाठी पाठविले.
महिलेच्या वैद्यकीय तपासणीमध्ये आलेला अहवाल मारहाणीच्या संदर्भाने सकारात्मक असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार तो जबाब प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी नांदेडच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे पाठविला आहे. अद्याप त्यावर काही निर्णय झालेला नाही. तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी महिलेच्या सांगण्याप्रमाणे जी तारीख आहे त्या दिवशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सर्व पोलीसांचे फोटो मागविले आहे. कारण त्या महिलेने जबाबात सांगितले आहे की, मी मारहाण करणाऱ्यांना ओळखतो. अद्याप या प्रकरणाचा अंतिम निर्णय काही झालेला नाही. परंतू हे प्रकरण सध्या न्यायालयामध्ये आहे. आता ती महिला आपले 26 हजार रुपये परत मागणार आहे अशी माहिती सुध्दा प्राप्त झाली आहे.