पोलीसांच्या वाहनात कच्चे कैदी आणि पोलीसांमध्ये झाली वादावादी

नांदेड(प्रतिनिधी)-आज न्यायालयात तुरूंगातून आणलेल्या कच्या कैद्यांपैकी एकाने आपल्या साथीदारांनी आणलेल्या सुविधा का घेवू देत नाही. म्हणून गोंधळ घातला.कच्चे  कैदी गाडीत बसल्यानंतर बाहेरचा एक व्यक्ती व्हिडीओ तयार करत असतांना पोलीसांनी त्याचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर गोंधळात वाढ झाली. तुरूंगातून कच्चे कैदी आणतांना आणि परत नेतांना पोलीस खाते करील तेच होईल या म्हणीचा प्रत्यय यायला हवा.
पोलीस विभागाच्या मोठ्या वाहनांमध्ये अनेक फौजदारी खटल्यांमधील कच्चे कैदी आणले जातात आणि त्यांची तारीख संपल्यानंतर त्यांना परत तुरूंगात नेऊन सोडतात. आज एका मोठ्या गाडीत काही कैदी आणले. त्यांची तारीख संपल्यानंतर आरोपींना गाडीमध्ये बसवित असतांना एका कैद्याच्या साथीदारांनी त्याला देण्यासाठी आणलेल्या सुविधा पोलीसांनी देऊ दिल्या नाहीत. यामुळे गोंधळ झाला. गाडी चालकाने त्या गाडीचे तोंड परत दक्षीण दिशेकडे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मैदानाचा उपयोग केला. त्या दरम्यान गाडीतील कैद्यांपैकी एकाच्या हितचिंतकाने बाहेरहुन त्याचा व्हिडीओ बनवत असतांना पोलीसांनी व्हिडीओ बनविणाऱ्याचा मोबाईल हिसकावला. त्यामुळे गोंधळ जास्त झाला. आता गोंधळात काय-काय झाला त्याबद्दल घटना पाहणाऱ्यांनी मिठ मिर्ची लावून वर्णन केले. परंतू या घटनाक्रमाची कोणतीही नोंद पोलीस ठाणे वजिराबादमध्ये वृत्त लिहिपर्यंत झाली नाही.
तुरूंगातून कैदी आणणे आणि परत तुरंगात नेऊ सोडणे हा एक मोठा कालावधी लागणारा पोलीसांच्या कामाचा भाग आहे. पोलीस विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे एका कैद्यासोबत किती पोलीस द्यावेत या संदर्भाची नियमावली अनेक वेळेस पुर्णपणे पाळली जात नाही. कैद्यांना तुरूंगातून आणणारे काही पोलीस आप-आपल्या दुचाकींवर येतात आणि दुचाकीवरच परत जातात. त्यामुळे गाडीमध्ये पोलीसांची कमतरता होते. कैद्यांना न्यायालयात आणल्यानंतर कैद्यांचे हितचिंतक, त्यांचे मित्र, त्यांची कुटूंबिय मंडळी येतात. ही मंडळी कैद्यांसाठी खाण्या-पिण्याच्या वस्तू, सिगारेट, गुटखा आणि इतर अनेक वस्तु आणतात. पोलीसांच्या पथकामध्ये काही लोक कैद्याला कोणी काही देवू नये या मताचे असतात. तर काही मंडळी जाऊ द्या या मताचे असतात. त्यामुळे सुध्दा कधी-कधी गोंधळ होतो. कैदी न्यायालयात येत असतांना आणि परत जात असतांना कैद्यांचे काही जवळी लोक त्यांचे फोटो काढतात, व्हिडीओ तयार करतात आणि त्यांचा वापर रिल्समध्ये होतो. कैद्यांसोबत असलेली पोलीस कैदी सोडून व्हिडीओ किंवा फोटो घेणाऱ्यांकडे जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्या पोलीसांची अडचण होते. पण अखेर ठपका पोलीसांवरच ठेवला  जात असतो. यातून योग्य आणि सक्षम मार्ग काढण्याची गरज आहे.
काही वेळेस मकोका प्रकरणातील कैद्यांना न्यायालयात आणल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखाचे एक पथक त्यांच्या आसपास नजर ठेवण्यासाठी नियुक्त केले जाते. पण ती सोय त्या एका खटल्यापुरती असते.यासाठी दररोजच न्यायालयात दणकट  पोलीसांचे एक पथक तैनात करण्यात यायला हवे. तरच तुरूंगातून आणलेल्या कैद्यांकडून आज केला तसा दुर्देवी प्रसंग होणार नाही. न्यायालयात आज घडलेल्या प्रकारामध्ये पोलीस खाते करील तेच होईल ही म्हण खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात यायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!