नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे अर्धापूर आणि पोलीस ठाणे मरखेलच्या हद्दीत पोलीस आहोत अशी बतावणी करून अनुक्रमे 60 व 50 वर्षीय व्यक्तीला ठकवून अज्ञात चोरट्यांनी जवळपास 1 लाख 75 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला आहे.
अर्धापूर जवळच्या मालेगाव चौकात मुरलीधर मारोती मोरे(60) हे शेतकरी आणि त्यांच्या पत्नी दि.25 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता मालेगाव चौकात थांबले असतांना दोन अज्ञात व्यक्ती तेथे आले आणि आम्ही पोलीस आहोत, बॅंकेत दरोडा पडलेले आहे. तुमच्याजवळील सोने-नाणे असतील तर ते आमच्याकडे द्या आणि नंतर तुम्ही पोलीस ठाण्यात येवून तुमचे साहित्य घेवून जा असे सांगितल्याने पती-पत्नीने आपल्याकडील सोन्याची 7 ग्रॅमची अंगठी, 5 ग्रॅमची अंगठी, 3 ग्रॅमची अंगठी असे एकूण 1 लाख रुपयांचे साहित्य त्यांच्याकडे दिले आणि काही वेळातच ते दोन ठकसेन पळून गेले.अर्धापूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 527/2024 नुसार नोंदवली असून पोलीस अंमलदार चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
चंद्रकांत माधवराव बाभळगावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.26 सप्टेंबर रोजी सायंकळी 5.30 वाजेच्यासुमारास सुभाषनगर ता. देगलूर येथे त्यांच्याजवळ आले आणि आम्ही ड्युटीवर असल्याचे सांगून तुमच्या पिशवीत गुटखा आहे तो तपासायचा आहे तसेच औराद येथे सोन्यासाठी भांडणे झाले आहेत असे सांगून तुमच्याकडील सोने काढून द्या पिशवीत ठेवतो असे सांगून त्यांच्या अंगावरील 5-5 ग्रॅमच्या दोन अंगठ्या त्यांच्या पत्नी जवळचे 2 तोळ्याचे पोहे हार असा एकूण 75 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज काढून घेतला आणि दोन वेगवेगळ्या पुड्या बांधून खोटे दागिणे त्यात ठेवले आणि आमची फसवणूक केली. मरखेल पोलीसांनी हा घटना क्रमांक गुन्हा क्रमांक 221/2024 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार गजभारे पाटील हे करीत आहेत.