नांदेड(प्रतिनिधी)-शहरात पायी चालणाऱ्या लोकांचे मोबाईल बळजबरीने हिसकावून नेणाऱ्या गॅंगमधील तीन जणांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहे. त्यातील दोन जण विधीसंघर्षग्रस्त बालक आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी आज शुभम उर्फ बंटी प्रकाश दुधमल(24) रा.सुगाव (खु) ता.जि.नांदेड यासह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलीस ठाणे भाग्यनगर अंतर्गत त्यांनी जबरी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडे चोरी केलेले 6 मोबाईल सापडले. या शुभम उर्फ बंटी प्रकाश दुधमल आणि इतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना पोलीस ठाणे भाग्यनगरच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या चोरट्यांकडून जप्त केलेल्या 6 मोबाईलची किंमत 91 हजार 500 रुपये आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, राजू सिटीकर, दिपक ओढणे, संतोष बेल्लूरोड, विलास कदम, बालाजी कदम, तिरुपती तेलंग, मोरे, गंगाधर घुगे यांचे या कारवाईसाठी कौतुक केले आहे.