महाराष्ट्राच्या कर्णधारपदी लातूरच्या साक्षी रोकडे
नांदेड(प्रतिनिधी)-दि.20 ते 23 सप्टेंबर 2024 दरम्यान गोंदिया जिल्ह्यात संपन्न झालेल्या 43 व्या महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पीयनशिप स्पर्धा 2024-2025 मध्ये लातूर जिल्ह्याच्या संघाने पुणे जिल्ह्यावर 2-1 या फरकाने विजय मिळवून सुवर्ण पदक कमावले आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला होता. राज्यातील जवळपास 600 मुले आणि मुली यांनी या स्पर्धेत आपल्या खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्याच दिवशी लातूर जिल्ह्याने अमरावती व बुलढाणा जिल्हा या दोघांना सरळसरळ दोन सेटमध्ये हरवून एकतर्फी विजय मिळवून स्पर्धेत आपली दावेदारी स्पष्ट केली. राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे, रायगड, यजमान गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांवर विजय मिळवत. लातूर जिल्ह्याने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. मागील वर्षीच्या स्पर्धेतील रौप्य विजेता हिंगोली जिल्हा यांना हरवून लातूर जिल्ह्याने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
गत वर्षीच्या विजेत्या आणि बलाढ्य अशा पुणे जिल्ह्यावर लातूर जिल्ह्याने 2-1 अशा फरकाने मात केली. यामुळे त्यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले. लातूर जिल्ह्याच्या कर्णधार साक्षी रोकडे यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळ प्रदर्शनामुळे त्यांना उत्कृष्ट खेळाडू हा सन्मान मिळाला. राज्य संघटनेचे महासचिव अतुल इंगळे, कार्याध्यक्ष डी.एस.गोसावी, कोषाध्यक्ष विजय पळसकर, उपाध्यक्ष रिंकू पापडकर, राजाभाऊ भंडारकर, डॉ.हरीष काळे, सौ.मंजुषा खापरे यांनी साक्षी रोकडेला महाराष्ट्र संघाचे कर्णधार जाहीर केले. लातूर जिल्ह्याची दुसरी खेळाडू नंदीनी माळेकरी यांचीही महाराष्ट्र संघात निवड झाली. येत्या 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंेबर दरम्यान रोहतक हरीयाना येथे होणाऱ्या ऑल इंडिया नॅशनल बॉल बॅडमिंटनसाठी साक्षी रोकडे आणि नंदीनी माळेकरी या रवाना झाल्या आहेत.
विजयी लातूर जिल्हा संघात साक्षी रोकडे, नंदीनी माळेकरी यांच्यासह नंदीनी सुर्यवंशी, अनुराधा सुर्यवंशी, रोहिणी सुर्यवंशी, संस्कृती पाटील, वंदना ढवळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यांना प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय खेळाडू मनिषा सुर्यवंशी, शेख अर्शद, आमेर, आयुब यांनी मार्गदर्शन केले. खेळाडूंच्या यशाबद्दल लातूर जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा भोसले, संगमेश्र्वर निला, शेख असद, अकबर पठाण, तानाजी कदम, नईम आणि निवड समितीचे सय्यद तरबेज, शेख अदनान, इमरान खान यांनी खेळाडूंचा सन्मान करून त्यांना पुढील यशासाठी शुभकामना दिल्या आहेत.
अंतरराष्ट्रीय खेळाडू पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांचा वाटा
लातूर जिल्ह्याचे भुमिपूत्र तथा नांदेड जिल्हा पोलीस दलात गुन्हे शोध पथकात काम करून एक निर्भिड व्यक्तीमत्व व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पोलीस उपनिरिक्षक शेख असद हे स्वत: अंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे नेतृत्व करणारे खेळाडू आहेत. त्यांना स्टार ऑफ इंडिया हा पुरस्कार प्राप्त आहे. लातूर येथील त्यांनी स्थापन केलेल्या असद स्पोर्टस ऍकॅडमीमध्ये खेळाडूंना प्रशिक्षण व इतर सोयी उपलब्ध आहेत.