नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकातील पोलीसांनी दोन ट्रकची तपासणी करून स्वस्त धान्याचा साठा असल्याच्या संशयावरून ते दोन ट्रक सध्या जमा केले आहेत. एका ट्रकमध्ये 80 कट्टे आणि दुसऱ्या ट्रकमध्ये 60 कट्टे असा स्वस्त धान्याचा साठा आहे. पोलीसांनी जप्त केलेला मुद्देमाल एकूण 24 लाख 85 हजार रुपयांचा आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.एस.आरसेवार, पोलीस अंमलदार मुंडकर, तलवारे, एंगाळे आणि वाघमारे आदींनी पोलीस ठाणे नायगाव हद्दीत गस्त करत असतांन नांदेड नायगाव रस्त्यावरील तहसील कार्यालयाजवळ मालवाहक वाहन क्रमांक एम.एच.26 बी.डी.8510 थांबवले. त्यात तांदुळ व गव्हाने भरलेले 80 कट्टे आहेत. त्यांची किंमत 1 लाख 10 हजार रुपये आहे. हा धान्य साठा स्वस्त धान्याचा असल्याचा संशय आहे. तसेच चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.26 बी.ई.4246 थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये तांदळाने भरलेली 60 कट्टे आहेत. त्यांची किंमत 75 हजार रुपये आहे. या दोन्ही गाड्या आणि स्वस्त धान्याचा साठा असा एकूण 24 लाख 85 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी सध्या नायगाव पोलीस ठाण्यात उभा केला आहे. पुरवठा विभागाच्या अहवालानंतर यावर कार्यवाही होणार आहे. पण हा धान्य साठा कोणाचा आहे, कुठून आला आणि कुठे जाणार याची काही माहिती पोलीसांनी दिलेली नाही.