नांदेड (प्रतिनिधि)-नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार महागडा झाला आहे. सर्वसामान्य रुग्णांना उपचार करणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक झाले आहे. अशावेळी सातत्यपूर्ण १३ वर्ष मेंदुचे विकार असलेल्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे हा राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी केले आहे.
मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि. जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदुचे विकार असलेल्या मुला-मुलींसाठीच्या आरोग्य शिबिरास गुरूवार दि. १९ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला असून शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आरोग्य शिबिरास भेट देवून याबाबतची माहिती घेतली. यावेळी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी, सचिव प्रकाश मालपाणी, कोषाध्यक्ष जयप्रकाश काबरा, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, बनारसीदास अग्रवाल, डॉ. सुरेश दागडीया, अंकित अग्रवाल, संजय बजाज व मूख्याध्यापक नितीन निर्मल यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल म्हणाले की, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राजस्थानी शिक्षण संस्था सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करत आहे. यापुढेही आरोग्य शिबिराची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी होऊन अधिकाधिक रुग्णांना याचा लाभ व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी आवश्यक ते सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भेट दिली.
दोन दिवसात जवळपास ६०० रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले आहे. आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मूख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या नियोजनात आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्री रामप्रताप मालपाणी मूक बधिर विद्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या आरोग्य शिबिराचा हजारो रुग्णांना लाभ होत आहे. हे आरोग्य शिबीर रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य तर त्यांच्या पालकात समाधान व्यक्त करणारे ठरले आहे.
टीम डॉ. अनैता हेगडेंचे कार्य प्रशंसनीय – डॉ. अजय मालपाणी
मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि. जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून डॉ. अनैता हेगडे, डॉ. अवि शहा व डॉ. अशा चिटणीससह ३५ डॉक्टरांची टीम सकाळी नऊ ते रात्री ११ या वेळेत रुग्णांवर मोफत तपासणी व उपचार करित आहेत. समाजाचे देणे लागतो या भावनेतून केलेले हे कार्य प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन अमेरिकेतून या शिबिरास भेट देण्यासाठी आलेल्या रेडीओलॉजिस्ट डॉ. अजय मालपाणी यांनी केले आहे.