नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत मौजे औराळा ता.कंधार येथील ग्रामसेवकाने एका शेतकऱ्याकडून गाव नमुना क्रमांक 8 देण्यासाठी 3 हजार 500 रुपयांची लाच स्विकारल्यानंतर त्याला ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द पोलीस ठाणे कंधार येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ग्राम पंचायत औराळा ता.कंधार येथील ईश्र्वर बालाजी डफडे (36) या ग्रामसवेकाने एका शेतकऱ्याकडून 3 हजार 500 रुपये लाच मागितली. त्या शेतकऱ्याला त्याच्या भुखंडाचा गाव नमुना क्रमांक 8 हवा होता. कारण शेतकऱ्याला बॅंकेकडून कर्ज घ्यायचे होते. पण ग्रामसवेक डफडेने लाच मागितली आणि मागितलेली लाच देण्याची इच्छा नसलेल्या त्या शेतकऱ्याने 18 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या लाच मागणीची पडताळणी केल्यानंतर पंचासमक्ष सुध्दा ग्रामसेवक ईश्र्वर बालाजी डफडेने 3 हजार 500 रुपयांची लाच मागितली. आज दि.19 सप्टेंबर रोजी ईश्र्वर डफडेने आपल्या घरी म्हणजे संभाजीनगर कंधार येथे गाव नमुना क्रमांक 8 देण्यासाठी पंचासमक्ष लाच स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी त्याला ताब्यात घेतले. वृत्त लिहिपर्यंत ईश्र्वर बालाजी डफडेविरुध्द कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लाच लचुपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदिप पालवे, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक माधुरी यावरीकर यांनी ही कार्यवाही आपल्या पोलीस अंमलदारांसह पुर्ण केली. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्ती(एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फि व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असेल तर जनतेने तात्काळ दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टोल फ्री क्रमांक 1064 वर याची माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.