रेकी करून पशुधन चोरणारे 6 व्यक्ती सोनखेड पोलीसांनी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी पशुधन चोरणाऱ्या सहा जणांना पकडून त्यांनी चोरीसाठी वापरलेली वाहने आणि पशुधन विकून जमवलेली रोख रक्कम 4 लाख 20 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील बऱ्याच दिवसापासून सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बरेच पशुधन चोरीला गेले. या संदर्भाने पोलीस ठाणे सोनखेड येथे 8 गुन्हे दाखल आहेत. तसेच तीन गुन्हे मुदखेड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या बाबत सोनखेड पोलीसांनी अत्यंत मेहनत करून रघुनाथ किशन मगरे(40), निखिल बालाजी कोल्हे(24) दोघे रा.काकांडी, निलेश आनंदा हनवते (23) रा.टेळकी, अरविंद भिमराव हटकर(27) रा.इजळी, आकाश वसंत गजभारे(22) रा.मेंढला आणि महम्मद अल्ताफ मोहम्मद आयुब कुरेशी(32) रा.देगलूरनाका नांदेड या सहा जणांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता या सर्वांनी नांदेड शहराच्या 40-50 किलो मिटरच्या परिसरात एकूण 40 जनावरांची चोरी केल्याची कबुली दिली. ज्यातील 8 गुन्हे पोलीस ठाणे सोनखेडच्या हद्दीत घडले आहेत आणि 3 मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहेत. ही सर्व मंडळी मागील 1 ते दीड वर्षापासून चार चाकी वाहन, दुचाकी गाड्या यांचा वापर करून जनावरांची रेखी करून जनावरे चोरी करत असत. जनावरे चोरी करण्यासाठी मोहम्मद अल्ताफ कुरेशी हा टेहळणी करीत असे आणि तो स्वत: कमी दरात जनावरे खरेदी करत असे. सध्या या सर्वांना सोनखेड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी या कार्यवाहीसाठी सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंंग माने, पोलीस उपनिरिक्षक वैशाली कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गणपत गिते, पोलीस अंमलदार विश्र्वनाथ हंबर्डे, वामन नागरगोजे, अंगद कदम, शाम बनसोडे, रमेश वाघमारे, त्रिशुल शंकरे, महेश शंकरे, दिंगबर कवळे, संतोषी मल्लेवार, केशव मुंडकर आणि उत्तम देवकते यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!