नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारात शासकीय माल जात असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच शनिवार दि.14 सप्टेंबर रोजी रामतिर्थ पोलीसांनी संशयीत असलेल्या एका ट्रकची झाडाझडती घेतली असता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तांदुळ असल्याचे निष्पन्न झाले आणि हा ट्रक त्यांनी पोलीस ठाण्यात घेवून जावून पुढील कार्यवाही सुरू केली आहे अशी माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात अवैध धंद्याविरुध्द मोठ्या प्रमाणात कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. यातच शासनाचा मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य आणि अंगणवाडीच खाऊ काळ्या बाजारात जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. शनिवारी नांदेड येथून तांदळाने भरलेला एक ट्रक देगलूरकडे जात असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या पथकाला मिळाली आणि या पथकाने कार्यवाही केली. यामध्ये त्यांना शंकरनगर जवळ तपासणी करत असतांना जवळपास 18 टन तांदळाने भरलेला ट्रक आढळून आला आणि याबाबत त्यांनी सखोल चौकशी केली असता. चालकाने उडवा-उडवीचे उत्तर दिले. ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.ई.7012 या ट्रकमध्ये हा तांदुळ आढळून आला. रामतिर्थ पोलीस ठाण्यात ट्रक आणि चालक या दोघांनाही चौकशीसाठी घेवून गेले आहे. हा तांदुळ स्वस्त धान्य दुकानाचाच असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पुढील कार्यवाहीसाठी महसुल विभागाला याची माहिती देण्यात आली. चौकशीनंतर हा तांदुळ नेमका कोणता आहे आणि कुठून कोठे जात होता याची माहिती समोर येवू शकेल.
ही कार्यवाही विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.एस.आरसेवार पोलीस अंमलदार बालाजी पोतदार, सोनबा मुंडकर, कृष्णा तलवारे, नारायण येंगाले, अनिल वाघमारे यांनी केली आहे.