नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडला लागलेला गद्दारांचा डाग पुसून काढा असा सल्ला शिवसेना उध्दव गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिला. या अगोदर विमानतळावर गेलेल्या शिवसैनिकांना पोलीसांनी आत जावू दिले नाही. तसेच खा.नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी सुध्दा अडवली यावरून तेथे वादावादी झाली. यापुर्वी सुध्दा पोलीसांनी बऱ्याच वेळेस असेच केलेले आहे.
खा.संजय राऊत हे आज नांदेडला आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. नांदेडमध्ये शिवसेनेतील काही लोकांनी केलेल्या गद्दारीबद्दल बोलतांना नांदेडच्या शिवसैनिकांनी आता हा गद्दारीचा डाग पुसू काढावा असे आवाहन केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य न्यायाधीश चंद्रचुड यांच्या घरात जाऊन गणपतीची पुजा करत आहेत. यावर बोलतांना खा.संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान आरती करत बसले आहेत. भारताचा 4 हजार किलो मिटरचा भुभाग चिनने बळकावला आहे. त्याबद्दल आम्ही घर घुसून मारु म्हणणारे केंद्र सरकार काय करत आहे असा प्रश्न उपस्थित केला. अरुणाचल प्रदेश या भारतीय राज्याच्या सिमेत 6 किलो मिटर आत घुसल्याचा उख खा.संजय राऊत यांनी केला. मणिपुरमध्ये असलेले परिस्थिती म्हणजे मणिपुर आता हातातून गेले आहे असे संजय राऊत यांनी सांगितले. आजपर्यंत मणिपुरवर का पंतप्रधान बोलत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. मणिपुरमध्ये भारतीय जनता पार्टीचे शासन असतांना सुध्दा तेथे घडलेला प्रकार हा जगभर भारताची बदनामी करणारा आहे. 56 इंचाचे सरकार आता लपून का बसले आहेत. याबद्दल जनतेला जाब द्यावा लागेल असे संजय राऊत म्हणाले. यानंतर ते शिवसैनिकांच्या मेळाव्यासाठी लोहा येथे रवाना झाले.
विमानतळावर अयोग्य नियोजन; शिवसैनिक भडकले
विमानतळावर खा.संजय राऊत येणार म्हणून हिंगोलीचे खा. नागेश पाटील आष्टीकर आणि अनेक उध्दव ठाकरे गटाचे शिवसैनिक पोहचले होते. परंतू शिवसैनिकांना विमानतळाच्या मुख्य दरवाज्याबाहेर गाड्या उभ्या करायला लावल्या आणि पोलीसांनी त्यांना पायीच आत जाण्यासाठी सांगितले. एवढेच नव्हे तर खा.नागेश पाटील आष्टीकर आल्यानंतर सुध्दा पोलीसांनी त्यांची गाडी आडवली आणि त्यांनी सुध्दा पायीच आत प्रवेश केला तेंव्हा मात्र शिवसैनिकांचा संयम समाप्त झाला. यानंतर पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोर-जोरात बोलणे झाले आणि त्यानंतर काही जणांना प्रवेश देण्यात आला.
यापुर्वी भारताच्या महामाहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू ह्या नांदेडला आल्या होत्या. तसेच केंद्रातील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी नांदेडला आले असतांना पोलीसांनी त्यावेळेस सुध्दा अनेकांना विमानतळात जाऊ दिले नाही. यासाठी एक सामोपचाराची भुमिका असायला हवी तरच नेहमी होणारा हा वाद पुढे होणार नाही. कारण आता विधानसभेची निवडणुक होणार आहे. या दरम्यान अनेक व्हीव्हीआयपी येतील आणि त्यावेळेस सुध्दा जनतेतील लोक आणि पत्रकार मंडळी विमानतळावर येतीलच .