देगलूर(प्रतिनिधी)-स्वस्त धान्याचा गहु आणि तांदुळ भरलेला एक ट्रक ऑपरेशन फ्लॅश आऊट दरम्यान विशेष पथकाने पकडला आहे. देगलूर पोलीस ठाण्यात हा ट्रक सध्या उभा आहे.
दि.10 सप्टेंबर रोजी पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकातील अधिकारी आणि पोलीस अंमलदार देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत असतांना त्यांनी देगलूर ते उदगीर रस्त्यावर कारेगाव फाट्याजवळ मालवाहतुक गाडी क्रमांक एम.एच.26 बी.डी. 8051 थांबवली. त्यामध्ये तांदुळ व गहू भरलेला होता. हा गहू आणि तांदुळ स्वस्त धान्याचा असल्याची शंका आल्याने हा ट्रक पथकाने देगलूर पोलीस ठाण्यात उभा केला आहे. याची तपासणी होणार आहे. ट्रकमध्ये 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा स्वस्त धान्याचा साठा आहे आणि ट्रकची किंमत 22 लाख रुपये आहे. असा 23 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल संशयीत अवस्थेत सापडला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव आदींनी पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.एस.आरसेवार, पोलीस अंमलदार पोतदार, मुंडकर, तलवारे, एंगाळे, वाघमारे यांचे कौतुक केले आहे.