नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर नाका परिसरातील हैदरबाग येथील एक घर 6 ते 10 सप्टेंबर दरम्यान बंद होते. या बंद घरामधील लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
देगलूर नाका परिसरात हैदरबाग येथे अब्दुल सलाम चावलवाला यांचे घर आहे. अब्दुल सलाम यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ते 6 सप्टेंबर रोजी आपले घर बंद करून मुंबईला गेले होते. आज 10 सप्टेंबर रोजी सकाळी परत आले तेंव्हा त्यांच्या घराचे दारे उघडीच होती. घरातील सामान आस्ताव्यवस्थ पडलेले होते. चोरीचा संशय आल्याने त्यांनी याबाबतची माहिती इतवारा पोलीसांना दिला. इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरिक्षक रनजित भोईटे आणि अनेक पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. अब्दुल सलाम चावलवाला यांनी सांगितल्याप्रमाणे चोरांनी घरातून अडीच लाख रुपये रोख रक्कम, अनेक सोन्याचे दागिणे, महागड्या घड्याळी आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत. पोलीसांनी या घटनेची माहिती घेण्यासाठी ठसे तज्ञ बोलावले आहेत. चोरट्यांचा काही माग मिळतो हे तपासण्यासाठी श्वान पथकाला पण बोलावण्यात आले आहे. या घरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच आसपासचे सीसीटीव्ही पाहुन चोरट्यांचा माग काढण्या प्रयत्न सुरू आहे. एकूण चोरीच्या रक्कमेची तपासणी होत आहे. परंतू लाखोंचा ऐवज गायब झाला आहे हे मात्र सत्यच.