नांदेड :- जिल्हाधिकारी कार्यालय व शासकीय दवाखानाच्या भोवतालच्या 100 मिटर परिसरात ढोल, ताशा, डॉल्बी सिस्टीम इत्यादी कर्णकर्कश वाद्य वाजविण्यास तसेच सभेसाठी, भाषणासाठी व इतर प्रयोजनासाठी ध्वनीवर्धक, ध्वनीक्षेपक यांचा वापर हा विहीत मर्यादे (दिवसा सकाळी 6 ते रात्री 10 यावेळेत 50 डेसीबल व रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत 40 डेसीबल) पेक्षा जास्त वारंवारतेने करण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 नुसार याद्वारे प्रतिबंध केले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) अन्वये आदेश निर्गमीत केले आहेत. हा आदेश 10 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील.
या आदेशाची अमंलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक तथा ध्वनी प्राधिकरण, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण मंडळ नांदेड (सदस्य, ध्वनी प्रदुषण संनियंत्रण समिती) व स्थानिक स्वराज्य संस्था (नांदेड वाघाळा शह महानगरालिका नांदेड) यांची राहील. प्रस्तुत आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबधीताविरुद्ध ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण ) नियम 2000 व पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील तरतूदीनुसार कार्यवाही करण्यात यावी, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.