स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या थीमअंतर्गत विशेष उपक्रमांचे आयोजन
नांदेड,:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा २०२४ मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली. या मोहिमेची थीम स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता अशी निश्चित करण्यात आली आहे.
या मोहीमेत गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर स्वच्छतेशी संबंधित विविध उपक्रम राबवले जातील. १७ सप्टेंबर रोजी अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. या मोहिमेदरम्यान १७ सप्टेंबर ते १ आक्टोंबर या कालावधीमध्ये दर दिवशी गाव स्तरावर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. मोहीमेत सफाई मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करून सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वार विविध सरकरी ोजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल. १९ सप्टेंबर रोजी श्रमदानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे सार्वजनिक स्थळे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, नद्यांचे किनारे, रस्ते आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या श्रमदान उपक्रमात स्थानिक नागरिकांसह एनएसएस, एनसीसी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, विविध मंडळे, आणि शासकीय कर्मचारी सहभाग घेण्यात येणार आहे.
स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने एकल प्लास्टिकविरोधी अभियान राबवले जाणार असून, लोकांना प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती केली जाईल. त्याचबरोबर, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या स्पर्धांचे आयोजन शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करण्यात येईल. तसेच
गावागावात एक झाड आईच्या नावे उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले जाईल. स्वच्छतेवर आधारित पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत स्वच्छतेबाबतचा संदेश पोहोचवला जाईल. यासाठी गर्दीच्या ठिकाणांची निवड करून विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.
दिनांक २९ सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील स्वच्छता प्रकल्पांचे उद्घाटन होईल. त्याचप्रमाणे १ ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. या मोहीमेच्या समारोप कार्यक्रमात २ ऑक्टोबर रोजी प्रत्येक गावात स्वच्छ भारत दिवस साजरा केला जाईल तसेच स्वच्छ माझे अंगण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कुटुंबांना सन्मानित करण्यात येईल. तरी या मोहिमेत गावकरी, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयातील युवक -युवती आदी मोठ्या संख्येने सहभागी होऊनय ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले व जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.