नांदेड(प्रतिनिधी)-गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आज नांदेड शहरात आणि जिल्ह्यात श्री गणेशाचे आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात सार्वजनिक गणेश मंडळे, घरगुती खाजगी गणपती घेवून जातांना लोकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. शहरात बऱ्याच ठिकाणी गणपती पुजेसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या दुकानावर गर्दी होती. पर्यावरणपुरक गणपती सुध्दा घेवून त्यांची प्रतिष्ठापणा करण्यात आली.
आज भाद्रपद चतुर्थी अर्थात श्री गणेशाचे आगमन. पार्थीव गणेश पुजनाची प्रथा भारतात आहे. लोकमान्य टिळकांनी या गणपती पुजनाला सार्वजिक स्वरुप देवून त्यावेळी इंग्रजांविरुध्द जनजागृती करण्यासाठी या गणेश पुजन सोहळ्यातील दहा दिवसांचा काळ उपयोगी आणला. तेंव्हापासून घरगुती गणेश पुजनासोबत सार्वजनिक गणेश पुजनाला महत्व प्राप्त झाले.
यावर्षी नांदेड जिल्ह्यात 3165 एकूण गणपती सार्वजनिक मंडळांची स्थापना होण्याची शक्यता आहे. त्यात ग्रामीण भागात 2122 गणपती मंडळ आणि शहरी भागात 1043 तसेच ग्रामीण भागात 2122 पैकी एक गाव एक गणपती 615 गावांमध्ये स्थापन केले जाणार आहेत.
आज पहाटेपासूनच गणपती मुर् खदी करणे, गौरी पुजनाच्या साहित्याची खरेदी करणे, गणपती सजावट साहित्य खरेदी करणे, गणपती पुजनाचे साहित्य खरेदी करणे यासाठी सर्वत्र रिघ लागली होती. गणेशमुर्तीसाठी इतवारा भागात गर्दी होती. तशीच काही गर्दी वजिराबाद, शिवाजीनगर, श्रीनगर, आनंदनगर, सिडको-हडको भागात दिसत होती. अनेक ग्रामीण लोकांनी गणेश पुजनासाठी लागणाऱ्या हराळी, आघाडा, कमळ फुले असे अनेक साहित्य आणले होते. गौरी पुजनात तयार करण्यात येणाऱ्या भाजीसाठी महिलांची गर्दी होती.
सकाळपासूनच ढोल ताशांच्या गजरात गणपती आगमनाची सुरूवात झाली. रात्रीउशीरापर्यंत काही सार्वजनिक गणेश मंडळे आपल्या गणेशमुर्तीची स्थापना करतात. घरा-घरांमध्ये मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत आज पहिल्या दिवशीची गणेश पुजा समाप्त केली जाते. आज गोदावरी नदीकाठावर हरतालिका पुजनाच्या साहित्याचे विसर्जन करण्यासाठी महिलांची गर्दी होती. अत्यंत आनंदात सर्वत्र गणपती आगमन सुरू आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव यांच्यासह अनेक पोलीस उपअधिक्षक, अनेक पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक , अनेक पोलीस अंमलदार आणि गृहरक्षक दलाचे महिला व पुरूष जवान परिश्रम घेत आहेत.