कृष्णुर धान्य घोटाळ्यानंतर आता अंगणवाडीतील बालकांचा खाऊ काळ्या बाजारात..!

नांदेड -नांदेड जिल्ह्यात कृष्णुर धान्य घोटाळ्यानंतर आता महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रावरील गरोदर माता आणि लहान मुलांना वाटप करण्यात येणारा आहार थेट खाजगी गोदामात पोहोचविला जात असल्याची बाब समोर आली आहे.

‘ऑपरेशन फ्लश आउट’ अंतर्गत कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत कुंटूर फाटा येथील रजवी नवाज हुसेन अब्दुल बारी यांच्या ताज ट्रेडर्स गोदामामध्ये तूरडाळीच्या १ हजार बॅग, ५०० बॅग चना, ८०० बॅक अरकळ, ५०० बॅग सोयाबीन अशा वेगवेगळ्या धान्याच्या २ हजार ८०० बॅग पोलिसांनी जप्त केल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात स्वस्त दुकानातील धान्याचा काळा बाजार नेहमी सुरू असतो त्याबरोबर आता या मोफत वाटप करण्यात येणाऱ्या आहाराचा काळाबाजार करणाऱ्यांमध्ये कोणकोणते अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत याचा आता पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे.

कुंटूर फाटा गोदामामध्ये अत्यावश्यक वस्तू अधिनियम अतर्गत येणाऱ्या मालाची साठवणूक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना ळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ‘ऑपरेशन फ्लश आउट’ पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार, कुंटूर पोलीस यांच्याबरोबर नायगावचे बाल प्रकल्पाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पुरवठा अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने कुंटूर फाटा येथे जाऊन पाहणी केली.

त्यावेळी नायगाव येथील रजवी नवाज हुसेन अब्दुल बारी याच्या कुंटूर फाटा येथील गोदामामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रावर गरोदर माता आणि लहान मुलांना वाटप करण्यात येणाऱ्या घरपोच आहाराच्या एनर्जी डेन्स तूर डाळ खिचडी प्रीमिक्सचे २५ पाकीट, एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्सचे २० पाकीट, मल्टीमिक्स सिरीयल्स अँड प्रोटीन प्रीमिक्सचे १०० पाकीट असे एकूण १४५ पाकिटे मिळाली. रजवीच्या गोदामाची पाहणी केली असता १ हजार बॅग तूर, ५०० बॅग चना, ८०० बॅग अरकळ, ५०० बॅग सोयाबीन सापडल्या आहेत.

त्यामध्ये एकात्मिक बाल विकास अंतर्गत अंगणवाडीचा खाऊ १४५ पाकीट, २० बॅग तांदूळ, १५ बॅग गहू तसेच एका आयचर वाहनांमध्ये १२० पोते तांदूळ, गहू चना सोयाबीन तर दुसऱ्या दोन आयचरमध्ये ८०० पोते चना आणि इतर धान्य तर एका ऑटोमध्ये चार पोते तांदूळ असे धान्य असलेले चार मोठे हॉल त्यामध्ये धान्याचे पोते बॅग भरलेले जप्त करण्यात आले आहेत. या गोदामाला पोलिसांनी सील केले असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत येणाऱ्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!