चला मुलींनो ! आता वडिलांना सांगू या उच्च शिक्षणासाठी मुलींना खर्च नाही !

मुलींना मोफत उच्च शिक्षण शासनाच्या निर्णयामुळे दिलासा

नांदेड- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यातही ग्रामीण भागातील मुलींना तर जास्त प्रमाणात अडचणी येतात. त्यांना शहरात शिक्षणासाठी राहणे म्हणजे शैक्षणिक शुल्क सोडून इतर अनेक बाबींसाठी पैसे खर्च होतात. जसे की निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य खरेदी, प्रवास अशा एक ना अनेक गोष्टीच्या खर्चाच्या बोजा त्यांच्या पालकांना उचलावा लागतो. त्यामुळे मुलींना शिक्षण द्यावे की नाही या संभ्रमात अनेक कुटूंबातील मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता होती.

 

कुटूंबातील आर्थिक बाब ही कुटुंबाच्या वाटचालीमध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे. या नव्या योजनेबद्दल बोलताना नांदेड येथे शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील मुलींनी आपल्या शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. परंतु आता महाराष्ट्र शासनाने मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमात मोफत शिक्षण 8 जुलै 2024 रोजी जो शासन निर्णय निर्गमित केला आहे, त्यामुळे अनेक मुलीच्या पालकांना व मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी दिलासा मिळून त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मुलींच्या शिक्षणाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.

 

मुलींच्या शब्दातील भावना

नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयातील एलएलबी प्रथम व द्वितीय वर्षातील व इतर महाविद्यालयातील ऋतुजा पाटील, उन्नती देशमुख, केसर अग्रवाल, मृणाली कदम, तनया हातने, जान्हवी भूजबळ, सोनाली आसटकर, प्रतिक्षा मोरे, गायत्री जोशी, ज्योति पुंडलिक पसींगराव, जानव्ही उदगीरकर, विद्या जाधव या साऱ्या जणी या योजनेच्या लाभार्थी आहे त्यांनी या योजनेचे भरभरून कौतुक केले आहे.

 

मुली म्हणतात, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्कात 50 टक्के ऐवजी आता 100 टक्के लाभ मंजूर केल्यामुळे मुलीच्या पालकांना व मुलींना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे मुलींना आता अर्धवट शिक्षण सोडावे लागणार नाही. शिक्षण पुर्ण केल्यामुळे त्या आता स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी होण्यास मदत होईल. या निर्णयामुळे मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. याबाबत सर्व विद्यार्थीनीनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत. नांदेड विभागात एकूण 97 अनुदानित महाविद्यालय, 219 विना अनुदानित महाविद्यालय व एक कृषि विद्यापिठ यांचा अंतर्भाव होतो.

 

मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नांदेड विभागातील सर्व शैक्षणिक संस्थाना आदेश दिले आहेत. शैक्षणिक संस्थानी देखील या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून या योजनेची माहिती व जागृती विद्यार्थीनीमध्येही झाली आहे.

 

या योजनेमुळे मुलींना उच्च शिक्षण घेण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळणार असून या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील मुलीचा टक्का वाढणार आहे. शासनाच्या या महत्वाकांक्षी निर्णयामुळे मुली व महिला आत्मनिर्भर व स्वावलंबी होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

 

यावेळी या सर्व मुलींनी आपल्याच सहकारी व मैत्रिणींना आवाहन केले आहे की उच्च शिक्षण घेताना कोणाला जरी अडचण येत असेल तरी घरीही बाब समजावून सांगा की आता शिक्षणासाठी कोणताही खर्च लागणार नाही त्यामुळे मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे ज्या पालकांना आमचा हा संदेश हाती पडेल त्यांनी देखील आता आपल्या मुलींना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून दूर ठेऊ नये.

 

मुलींनी यावेळेस हाही संदेश दिला की सध्या मुली शिक्षित होताना दिसत आहेत मात्र जागतिक पातळीवर उच्च शिक्षणामधील मुलींचा टक्का हा भारतासाठी फार आनंददायी बाब नाही यामध्ये भरपूर वाव आहे हा टक्का आम्हाला वाढवायचा आहे शासनाने त्यासाठी या योजनेचे पाठबळ दिले आहे त्यामुळे मुलींनी मुलांच्या तुलनेत शिक्षित होण्यासाठी या योजनेचा फायदा घ्यावा.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणाला अडचण असल्यास त्यांनी शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. नांदेडमध्ये हे कार्यालय शासकीय तंत्रनिकेतनच्या पाठीमागे दयानंदनगर याठिकाणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!