प्रसन्नता हेच आपल्या जीवनातील सर्वात मोठे सुख-पंडित प्रदीपजी मिश्रा

शिवमहापुराण कथामंडपात अवतरला शिवभक्तीसागर
नांदेड (प्रतिनिधी)-आपण मृत्यूलोकात आहोत, येथे सुख आणि दुःख या दोन्ही बाजूंचा सामना करावा लागतो,सर्वांच्याच वाट्याला कधी सुख तर कधी दुःख येणारच,जीवनात कितीही मोठे दुःख आले तरी शिवभक्तीवरील दृढता,विश्वास प्रबळ असायला हवा, परमात्म्याला भक्तीचा आनंद, प्रसन्नता प्रीय आहे, चेहर्‍यावर नेहमी प्रसन्नता ठेवा,डमरुवाले बाबा तुमच्या जीवनात कधी ना कधी सुखप्राप्ती प्रदान करतील,जीवनातील सर्वात मोठे सुख म्हणजे प्रसन्नता हेच आहे, असे संबोधन शिवमहापुराण कथावाचनाच्या चौथ्या दिवशी परमपुज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी केले. चौथ्या दिवशी मोदी मैदानातील कथामंडपात झालेल्या कथावाचनाचा लाभ घेण्यासाठी अक्षरशः लाखोंच्या संख्येने भक्तीसागर उसळला होता.
गेले दोन दिवस पावसाने विश्रांती दिल्याने चौथ्या दिवसाची शिवमहापुराण कथा कौठा येथील नियोजित मोदी मैदानावर झाली.कथा श्रवणासाठी आतुर झालेल्या लाखो भाविकांनी अलोट गर्दी केली होती. पंडितजी आज कथावाचन करणार याचा आनंद सर्व भाविकांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. शिवभक्तीत सर्वजण तल्लीन झाले होते.
गुरुदेव म्हणाले, शिवजी करुणासागर आहेत,अंतःकरणातून शिवजींची उपासना, आराधना, नामस्मरण करणार्‍या आपल्या भक्तावर त्याची सदैव कृपादृष्टी असते. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे,भगवान श्रीकृष्ण असोत, की भगवान श्रीराम असोत, त्यांच्याही चरित्रात त्यांच्या वाट्याला आलेल्या दुःखाचा उल्लेख आहे.त्यांचे चरित्र आपण आत्मसात केले पाहिजे,ज्योतिष्यांना, महाराजांना आपला हात, भाग्य दाखवून आपली भाग्यरेषा बदलता येणार नाही, शिवालयात, शिवमंदिरात जा, शिवजींना जलार्पण करा, आपल्या शिवभक्तीवर विश्वास ठेवा, भरपूर परिश्रम कराल तर तुमची भाग्यरेषा तुम्हीच बदलून टाकाल, असा विश्वास पंडितजींनी भक्तांना दिला.
आपल्याला मिळालेली सत्ता, पद, प्रतिष्ठा आणि गणवेषाचा सन्मान राखा परंतु अभिमान, गर्व करू नका, पद, सत्ता कधी ना कधी जाणारच आहे, त्याचा सदुपयोग करा, जीवनात अनेक विघ्न, संकटे येतील, लोक तुम्हाला टोमणे मारतील, शिव्या घालतील, अशा लोकांकडे लक्ष देवू नका, कर्जाचा डोंगर झाला म्हणून दुःखी होऊ नका, शिवजींची आराधना करा, तुम्हाला दुःखातून, संकटातून बाहेर काढणारा भोले शिवशंकर तुमच्या पाठीशी उभा आहे, प्रभू श्रीराम, श्रीकृष्णाने सुद्धा धारण केलेली ही शिवभक्ती काही साधारण शिवभक्ती नव्हे, मन आणि विचार शुद्ध ठेवा. जीवनात कितीही गडद अंधार आला तरी शिवभक्तीच्या माध्यमातून प्रकाशज्योत प्रज्ज्वल्लीत करा, असा संदेश पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!