काल रात्री नांदेड पोलीसांनी शहरभर राबविले ऑलआऊट ऑपरेशन

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात नांदेड शहरातील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. 19 ऑगस्टच्या रात्री 10 ते 20 ऑगस्टच्या पहाटे 4 वाजेदरम्यान हे ऑलआऊट ऑपरेशन सुरू होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ, इतवारा आणि नांदेड ग्रामीण या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 19-20 ऑगस्टच्या रात्री 6 तास ऑलऑऊट ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान पोलीसांनी सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी नाकेबंदी केली होती. येणारी-जाणारी वाहने, नागरीक यांना थांबवून त्यांची विचारपुस झाली. यासोबतच वेगवेगळ्या गल्लीबोळांमध्ये पाहिजे आणि फरारी आरोपी शोधले, वॉरंट बजावले अशी अनेक कामे केली. यामध्ये दोन अपर पोलीस अधिक्षक, दोन पोलीस उपअधिक्षक, 28 पोलीस अधिकारी, 143 पोलीस अंमलदार, 2 आरसीपी पालाटून यांनी ही कार्यवाही केली. या दरम्यान अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे 47, ऐवजासंबंधी गुन्हे करणारे 58 आरोपी तपासण्यात आले. 13 व्यक्तींना वॉरंट तामील करण्यात आले. शहरातील सर्व नाकाबंदी पॉईंटवर 266 वाहनांची तपासणी झाली.
या ऑपरेशनदरम्यान नांदेड पोलीसांनी कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे 6 महिन्यासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार केलेले राजू माधवराव केंद्रे(47) रा.शेल्लाळी ता.कंधार, सत्यम राजू केंद्रे(22) यांना स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांच्या पथकाने पकडून त्यांना भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. इतवाराा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आरोपीकडून तपासणीमध्ये खंजीर मिळाल्याने त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही ऑलआऊट ऑपरेशनची कार्यवाही पोलीस अधिक्षक अबिनाशकुमसार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे आणि सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!