नांदेड(प्रतिनिधी)-मौजे रुई ता.माहुर येथे एका 21 वर्षीय युवकाचा शेती नावावर करून देण्यासाठी झालेल्या वादानंतर खून करण्याचा प्रकार घडला आहे.
पंदुस शेरुसाब देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.18 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास मौजे रुई येथे साहिल बबलु देशमुख आणि सोहेल बबलु देशमुख यांनी पोलीस पाटील यांच्या घरासमोर शेतीच्या वादावरुन सुरू असलेल्या बैठकीच्यावेळेस अडीच एकर शेती आमच्या नावावर करून द्या असा वाद घातला. या वादाच्यावेळेस झालेल्या बोलाचाली दरम्यान साहिल बबलु देशमुख आणि त्याचा भाऊ सोहेल बबलू देशमुख यांनी त्यांचा मुलगा परवेज पंतुस देशमुख यास पकडून लोखंडी विळ्याने छातीवर वार करून त्याला जिवे मारले आहे.
घटना घडताच माहुरचे पोलीस उपअधिक्षक मळगणे,सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद मुळे, गायकवाड आदींनी घटनास्थळी भेट दिली. पंदुस शेरुसाहब देशमुख यांच्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेतील कलम 103(1), 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 110/2024 दाखल केला आहे. या खुन प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड हे करणार आहेत.
शेतीच्या वादातून रुई ता.माहुर येथे युवकाचा खून
