महिला पीएचडी गाईडने 4 वर्षात दरमहा 10 प्रमाणे 5 लाख लाच मागितली ; तीन जणांना अटक

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी)-नोव्हेेंंबर 2022 ते नोव्हेंबर 2026 अशा चार वर्षाच्या कालखंडात दरमहा 10 हजार रुपये लाच मागणी करणाऱ्या महिला ग्रंथपाल, त्यांचा मुलगा आणि इतर दोन अशा चार जणांविरुध्द लाच लुचपत विभाग जालनाने तिन जणांना पकडून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. लाच मागणी करण्यात आली तो तक्रारदार विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) साठी ग्रंथालय व माहिती शास्त्र या विषयात संशोधन करीत होता. हे संशोधन सुध्दा फेलोशिपवर होते.
एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार डॉ.रफिक झकेरीया महिला महाविद्यालय नवखंडा छत्रपती संभाजीनगर येथील ग्रंथपाल आणि संशोधक मार्गदर्शक (पीएचडी गाईड) श्रीमती एराज सिद्दीकी यांनी तक्रारदाराकडे दरमहा दहा हजार रुपये आणि ते सुध्दा चार वर्ष अशी पाच लाख रुपये राऊंडफिगर लाचेची मागणी केली. तक्रारदाराला महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्याकडून अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) मिळवली होती. यासाठी त्यांना पीएचडी गाईड डॉ.सिद्दीकी यांच्याकडून प्रत्येक महिन्याला विविध कागदपत्रांवर अहवाल, स्वाक्षऱ्या, प्रमाणपत्र, हजेरी पत्र घ्यावे लागत असे आणि ते विद्यापीठात सादर करावे लागत असे आणि हे सर्व सादरीकरण केल्यानंतर तक्रारदाराला दरमहा 50 हजार 400 रुपये मिळत होते. हे सर्व कागदपत्र देण्यासाठी पीएचडी गाईड डॉ.एराज सिद्दीकी यांनी दरमहा 10 हजार रुपये लाच मागितली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 24 जुलै 2024, 25 जुलै, 27 जुलै आणि 29 जुलै 2024 रोजी या लाच मागणीची पडताळणी केली.या पडताळणीमध्ये 24 जुलै रोजी 25 हजार रुपये लाच मागितली, 27 जुलै रोजी डॉ.एराज सिद्दीकी यांनी त्यांचा मुलगा डॉ.सिद्दीकी मोहम्मद फेसोद्दीन उर्फ समीर मोहम्मद रियाजोद्दीन(हे सहाय्यक संचालक इआरएस रिसर्च ऍन्ड टेकनॉलॉजी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत) यांच्याकडे लाच देण्यास सांगितले.हे खाजगी इसम आहेत. त्यानुसार लाच मागलेल्या 5 लाखांपैकी 50 हजार रुपये रक्कम 19 ऑगस्ट 2024 रोजी पीएचडी गाईड सिद्दीकी यांच्या मुलाच्या संस्थेत सिद्दीकी फराज मोहम्मद रियाजोद्दीन याने स्विकारली. तसेच या लाच मागणी प्रकरणात डॉ.रफिक झकेरीया महिला महाविद्यालय येथील ग्रंथालय परिचारक शेख उमर शेख गनी हे सुध्दा सहभागी आहेत. आज 19 ऑगस्ट रोजी 50 हजार रुपयांची लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांनी शेख उमर शेख गनी, डॉ.सिद्दीकी मोहम्मद फेसोद्दीन उर्फ समीर महम्मद रियाजोद्दीन आणि त्यांचा भाऊ फराज सिद्दीकी मोहम्मद रियाजोद्दीन यांना ताब्यात घेतले असून पोलीस ठाणे बेगमपुरा छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या सर्व कार्यवाहीमध्ये पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधिक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक शंकर मुटेकर, पोलीस अंमलदार गजानन धायवत, गजानन खरात, शिवाजी जमदडे, गणेश चेरके, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, शेख जावेद, भालचंद्र बिनोरकर, विठ्ठल कापसे आणि महिला पोलीस अंमलदार कुंठे यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!