पोलीसांकडे येणाऱ्या तक्रारीला दोन बाजू असतात, तुम्ही खऱ्याला न्याय द्या-शहाजी उमाप

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीला दोन बाजू असतात. त्या दोन पैकी ज्याची बाजु खरी आहे त्याला मदत करा असे प्रतिसादन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केले.
सन 2012 मध्ये पोलीस अधिक्षक या पदावर शहाजी उमाप नांदेड जिल्ह्यात कार्यरत असतांना त्यांनी भरती केलेल्या 272 महिला व पुरूष पोलीस अंमलदारांनी काल दि.16 ऑगस्ट रोजी शहरातील तुलसी कंफर्ट या हॉटेलमध्ये स्नेहमिलनाचे आयोजन केले होते.त्या कार्यक्रमात शहाजी उमाप बोलत होते. या कार्यक्रमात नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाशकुमार,  अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांची उपस्थिती होती.


प्रथम 2012 बॅचच्या 272 पोलीसांनी तयार केलेले स्मृतीचिन्ह शहाजी उमाप आणि सुरज गुरव यांनी प्रत्येक पोलीसाला दिले. त्यानंतर पुढे बोलतांना शहाजी उमाप म्हणाले पोलीस ठाण्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा पिडीत असतो. कधी-कधी-पिडीताअगोदर त्याचा विरोधक पोलीसांकडे येतो. पोलीसांकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रारीला दोन बाजू असतात त्यातील सत्य जाणून घेवून जो खरा असेल त्यालाच न्याय देण्यासाठी तुम्ही तयार राहा आणि त्यालाच मदत करा हीच खरी पोलीसींग आहे.


आज एका तपानंतर तुमच्यामुळे मला जुन्या आठवणी उजळून आल्या. माझ्या समक्ष पोलीस झालेल्या तुम्हा सर्वांसोबत भेटतांना मला मनस्वी अत्यंत आनंद होत आहे. मी बऱ्याच जागी पोलीस भरतीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. परंतू तुम्हाला घेतले तेंव्हा मी पोलीस अधिक्षक होतो. त्यामुळे माझ्यावर जबाबदारी जास्त होती. सर्व सामान्य कुटूंबातून आलेल्या, शेतकऱ्यांच्या मुलांना कसा न्याय देता येईल यासाठीच मी प्रयत्न केले. कारण सध्याच्या काळात युवकांना रोजगाराची सर्वात मोठी संधी पोलीस दलाच्या माध्यमानेच उपलब्ध आहे. त्यामुळे माझा दृष्टीकोण पोलीस भरतीच्यावेळेस सहानभुतीचाच होता.


2012 च्या भरती प्रक्रियेतील एक किस्सा सांगतांना शहाजी उमाप यांनी इंदु गवळी या महिला पोलीसाचा उल्लेख केला. त्यावेळेस शारिरीक चाचणी प्रक्रिया सुरू होती, पण इंदु गवळीचे नाव पोलीस महासंचालक कार्यालयाच्या यादीत मला आले नव्हते. त्यासाठी मी पोलीस महासंचालक कार्यालयास भरपूर ईमेल पाठविले. अखेर शारिरीक चाचणी संपली पण मी मैदान सोडले नव्हते. शेवटच्या क्षणी इंदु गवळीला संधी देण्याचा ईमेल मला आला आणि त्यावेळी मी इंदु गवळीला म्हणालो की आता तु पळ. इंदु गवळीने सुध्दा 15 मिनिटात शारिरीक चाचणीचे सर्व प्रकार पुर्ण केले आणि तिने शारिरीक चाचणीत 100 टक्के गुण मिळविले. पुढे लेखी परिक्षा झाली. पण तिला लेखी परिक्षेत फक्त 27 गुण मिळाले. त्यामुळे तिचा गुणांचा आकडा एकूण 127 झाला. त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने समांतर आरक्षणाबाबत एक नुतन निकाल आला होता. त्यानुसार तयार झालेली पोलीस भरतीची यादी मला बदलावी लागली होती. परंतू बदलेल्या परिस्थितीत 45 जण नवीन आले आणि त्यात इंदु गवळीचा क्रमांक हा गुणवत्ता यादीत सर्वात शेवटचा होता. म्हणून मी या घटनेला मी पुर्णपणे लक्षात ठेवलेले आहे.

पोलीस भरतीमध्ये लेखी पेपर सेट करणे, त्याची छपाई, पेपर वाटप आणि तुम्हाला तो देवून सोडवून घेणे ही प्रक्रिया सर्वात अवघड होती. आदल्या रात्री पेपर सेट केला त्याला छपाईसाठी मशिनस मागविल्या. पण अचानक मशीन बंद पडली आणि माझी गोची झाली. त्यानंतर 845 किलो वजनाची एक मशीन तेथे मागविली त्यातून मशीनचा एक पार्ट खाली पडला तरी पण ती चालू राहिली आणि त्या मशिनने तुमच्यासाठी पेपर तयार केले. हा सर्व प्रकार तुम्ही मैदानावर परिक्षा देण्यासाठी येईपर्यंत सुरू होता. मला त्यावेळी सर्वात जास्त चिंता होती की, दीड तास पेपर सोडविण्याचा वेळ देतांना तो सुर्यास्ताच्या सोबतच संपला पाहिजे. नसता तुमच्या पैकी कोणी तरी माझ्या विरुध्द अपील केले असते की आम्हाला पेपर दिसलाच नाही. पण माझ्या मनातील मेहनतीचा भाव या आधारावरच मी येथे काम अत्यंत नियोजनपणे आणि वेळेत पुर्ण केले. माझ्यासाठी पोलीस भरतीचा अनुभव नवीन नव्हता. पण त्यावेळी साधनांनी दगा दिला होता. तरीपण मी अत्यंत पारदर्शक पणे निवड प्रक्रिया पार पाडली.

तुमच्यातील काही जण आपले मत व्यक्त करतांना सांगत होते की, आम्हाला आदेश उशीरा मिळाला. त्यामध्ये प्रशिक्षणाच्या केंद्रांवर नियोजन ठरवून ते आदेश निघतात. त्यात तुम्हाला 3 महिने जास्त प्रशिक्षण मिळाले. त्यामुळे तुम्ही इतर पोलीसांच्या मानाने जास्त सक्षम व्हावेत अशी मला आपेक्षा आहे. 12 वर्षाच्या एका तपात तुम्ही काही मित्र आणि मैत्रीणी गमावल्याचे मला तुम्ही सांगितले त्याबद्दल मला सोबत मांडायचे आहे की, सामाजिक संकेतस्थळांवर सुरू असलेल्या रिल्स आणि त्या रिल्स बनवतांना निवडलेल्या अत्यंत धोकादायक जागा तुम्हाला, तुमच्या कुटूंबाला, तुमच्या मुलांना धोका पोहचवू शकतात याचा विचार करा.
मी बदल्या करतांना एका पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार त्या पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात पाठवायचो. त्यात दुसरी बाजू अशी समोर आली की, असे घडल्यामुळे पोलीस अंमलदारांनी आपली घरेच बदलली नाही आणि नवीन पोलीस ठाण्यात जाण्या-येण्यासाठी दुचाकीचा वापर केला. तुम्ही गमावलेल्या मित्रांमध्ये दुचाकीच्या घटनापण संम्मिलित आहेत. आजच्या महामार्गांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे महामार्गावर धाव घेणाऱ्या वाहनांची गती अत्यंत जलद आहे. त्यामुळे महामार्गांवर दुचाकीचा वापर करून तुम्ही प्रवास करू नका, मोठ्या वाहनांमध्येच प्रवास करा जेणे करून अपघाताचा धोका आपल्यापासून दुर जाईल.


आरोग्य विषयी बोलतांना शहाजी उमाप म्हणाले 12-15 हजार परिक्षार्थींमधून तुम्ही 272 निवड प्रक्रियेत यशस्वी ठरला आहात. म्हणजे तुमचे आरोग्य त्यावेळी अत्यंत उदंड होते. आता नोकरी करतांना, कामातील अडचणींमुळे आरोग्यकडे दुर्लक्ष करू नका. कारण त्यामुळे तुमच्या क्षमतेमध्ये कमतरता येईल. काम करतांना झोप आणि जेवण याचे उत्कृष्ट नियोजन करा. इतर अनेक विभागांमध्ये तीन महिने दिवसपाळी आणि तीन महिने रात्रपाळी असे कर्तव्य ठरवले जात आहे. आपल्याकडे पण झाले तर चांगलेच आहे. कारण तीन महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्या शरिराला त्याची सवय होते आणि शारिरीक क्षती कमी होते.
तुमच्याकडे येणारा प्रत्येक माणुस हा काही तरी समस्या घेवून येतो. तुम्ही ज्या परिस्थितीतुन पुढे आला आहात. त्या परिस्थितीला कधीच विसरु नका. तरच तुम्ही त्या तुमच्याकडे येणाऱ्या पिडीताला न्याय देवू शकला. पोलीसांबद्दल जनतेची भावना न्यायाधीश असल्यासारखी आहे. कारण सर्वसामान्य नागरीकाला त्या नंतरचा खर्च पेैलवत नाही आणि म्हणूनच तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत तुमच्याकडे येणाऱ्या दोन पैकी खरा असणाऱ्याला न्याय द्या.
आपल्या गमावलेल्या मित्र-मैत्रीणींच्या कुटूंबियांच्या पाठीशी तुम्ही तुमची सर्व बॅच उभी राहिली पाहिजे यासाठी मानसिक तयारी करा आणि त्यांना काय आधार देता येईल यासाठी प्रयत्न करा. मी येथे येण्याअगोदरच तुम्ही सर्वांनी माझ्याकडून भरपूर काही मागणार अशी माहिती मला मिळाली आहे. यावेळी हश्या पिकला. आज मी येथे आहे तुमच्या अडचणीसाठी त्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटीबध्दच आहे. तसेच मी माझ्यावतीने तुम्हाला सांगतो की, तुम्हाला मला काही सुचवायचे असेल तरी ते तुम्ही सुचवू शकता असा अधिकार मी तुम्हाला देत आहे. त्यानंतर काय उत्कृष्ट करता येईल त्यासाठी तुम्ही आणि मी मिळून प्रयत्न करू. सोबतच भविष्यातील जीवनासाठी तुम्हा सर्वांना माझ्यावतीने शुभकामना आणि पोलीस जीवनात आपण उत्कृष्टच करण्यासाठी आलो आहोत यासाठी तुम्ही तयार राहा असे शहाजी उमाप यांनी सांगितले.


या स्नेहमिलनाच्या आयोजनात 2012 बॅचचे पोलीस अंमलदार रमेश मद्देवाड, विश्र्वनाथ पवार, शुभांगी जाधव, कोमल राठोड, गायत्री जाधव,  रामदास कोल्हे, माधव दंतापल्ले,साधना आढाव, मनीषा वाघमारे, रणधीर राजबंसी,विष्णू कल्याणकर, अविनाश धुमाळ
यांच्यासह अनेकांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!