नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अबचलनगर व गुरूद्वारा परिसरातील भागात वारंवार विद्युत खंडीत होवून होणाऱ्या त्रासासाठी जवळपास 100 नागरीकांनी अधिक्षक अभियंता वीज वितरण कंपनी यांना निवेदन देवून सुविधा देण्याची मागणी केली आहे. सोबतच आम्ही त्रासमुक्त झालो नाही तर लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करू आणि त्यानंतर तयार होणाऱ्या परिस्थितीला आपणच पुर्णपणे जबाबदार राहणार आहात असा इशारा दिला आहे.
सन 2007 मध्ये गुरुद्वारा परिसरातून काही लोकांना विस्थापित करण्यात आले आणि त्यांना अबचलनगर भागात पुर्नप्रस्थापित करण्यात आले. त्यावेळी तयार करण्यात आलेल्या सुविधांमध्ये आज सन 2024 पर्यंत काहीच सुविधा झालेली नाही. तसेच त्या भागातील विद्युत उपकरणांची देखरेख होत नाही आणि याचा परिणाम असा होतो की, अबचलनगर भाग आणि गुरुद्वारा परिसर या भागातील विद्युत खंडीत होत राहते. या भागात राहणाऱ्या वयोवृध्द नागरीक, बालके यांना विद्युत उपकरणे बंद राहत असल्यामुळे त्रास होत आहे. या भागात अनेक ठिकाणी मोकळ्या जागा असल्यामुळे त्यातून साप, विंचू, फिरत असतात. विद्युत तारांना सुरक्षा गार्ड नाही. त्यामुळे वेगवेगळ्या तारा हवेमुळे एकत्र येतात आणि त्यातून स्फोट घडत असतो. अशा प्रकारामुळे काही वर्षांअगोदर चिखलवाडी परिसरात विद्युत तारांमध्ये स्फोट होवून तार तुटली आणि दुर्घटना झाली असा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरीकांच्या निवेदनाप्रमाणे विद्युत पुरवठा खंडीत झाला तर कॉल सेंटर फोन उचलत नाही, अधिकारी प्रतिसाद देत नाहीत आणि जनतेला विद्युत संदर्भाने काही माहिती दिली जात नाही. यामुळे नागरीकांना मानसिक आणि तणावपुर्ण वातावरणात जगावे लागते. या सस्मयांचे लवकर समाधान काढले नाही तर लोकशाही मार्गाने आम्ही तिव्र आंदोलन करू आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामाला आपण जबाबदार राहाल असे निवेदनात लिहिले आहे. या निवेदनावर सरदार राजेंद्रसिंघ शाहु यांच्यासह शंभर नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.