नांदेड(प्रतिनिधी)-समृध्दी महामार्गांमध्ये सरकार चालविणाऱ्या लोकांची समृध्दी झाली आणि जनतेचे नुकसान झाले. विधानसभेमध्ये आमची सरकार आल्यानंतर आम्ही श्वेतपत्रिका जारी करून त्यात घोटाळा करणाऱ्यांविरुध्द नक्कीच कार्यवाही करणार आहोत असे प्रतिपादन कॉंगे्रस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
आज कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी कॉंगे्रस नेते नांदेडला आले असतांना ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेनिथल, नाना पटोले, खा.वसंतराव चव्हाण, आ.मोहनराव हंबर्डे, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, आनंद चव्हाण, बापु देशमुख, शेख मुन्तजिबोद्दीन यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले की, मराठवाडा ही संतांची भुमी आहे. मराठवाड्याने अनेक नेते राज्याला दिले आणि अनेक नेते देशाला दिले आहेत. सध्या सुरू असलेले राज्याचे सरकार राज्यातील सांस्कृतिक व सामाजिक व्यवस्थेला क्षतीपोहचवत आहे.केंद्र सरकार सुध्दा तांना मदत करते आहे. खोक्यांच्या व्यवस्थेत तयार झालेली ही सरकार विकासाच्या नावावर राज्यातील प्रत्येक घटकाची थटा करत आहे.
आता भारतीय जनता पार्टीतून कॉंगे्रस पक्षात सुध्दा आवक सुरू झाली आहे.लोकसभेप्रमाणे मराठवाड्याची जनता विधानसभेत सुध्दा कॉंगे्रस पक्षासोबत राहिल असा विश्र्वास पटोले यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान सुध्दा आता भ्रष्टाचाराच्या पिंजऱ्यात आले आहेत. येत्या विधानसभेमध्ये जात, पात, पंथ सोडून आम्ही योग्य उमेदवारांनाच उमेदवारी देवू आणि ज्यांनी बदमाशी केली आहे त्यांना उमेदवारी मिळणार नाही. देशात जातीय जनगणनेला होणारा विरोध हा आरक्षणाला विरोध आहे. कॉंगे्रस पक्षाच्यावतीने ज्या मागासवर्गीय जाती आहेत त्या सर्वांना 50 टक्यांच्या पुढे जाऊन आरक्षण कक्षेत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण केंद्र सरकार त्याला विरोध करत आहे. लाडकी बहिण या योजनेचा उल्लेख करून नाव न घेता नाना पटोले यांनी अजित पवारांवर कटाक्ष केला. लाडकी बहिण कशी असते हे त्यांनी दाखवल्याचे सांगितले. आता तर सार्वजनिक रित्या अजित पवारांनी बटन दाबा नाही तर योजना बंद होईल असे सांगितले आहे. म्हणजे या योजना फक्त निवडणुकीपुर्त्याच आहेत.
महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला विकणारे सरकार राज्यात काम करते आहे. राज्यात 5 लाख महिला व मुली बेपत्ता आहेत आणि त्याबद्दल राज्याचे लाचार गृहमंत्री विधानसभेत सांगतात की, त्यांच्या नोंदी आहेत पण त्या मुली व महिला कोठे आहेत हे आम्हाला माहित नाही यापेक्षा मोठे दुर्देव काय असू शकते.
महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चिनीथल या प्रसंगी म्हणाले सध्या विधानसभेत आयाराम सरकार आहे. हे सरकार जनतेने निवडलेले नाही.महाराष्ट्राच्या जनतेचे लोकसभेच्या निवडणुकीत दिलेल्या मतदानासाठी धन्यवाद देतांना येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुध्दा महाराष्ट्राची जनता कॉंगे्रस पक्षासोबतच राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली.