17 ऑगस्टला डीबीटीद्वारे लाभ जमा होणार
नांदेड :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील महिलांचे पाच लक्ष अर्ज पात्र ठरले आहेत. या सर्वांच्या बँक खात्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचा अर्थात तीन हजार रुपये जमा होणार आहे.
महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. पाच लक्ष अर्ज मंजूर झाले तरी ज्यांच्या खात्याशी आधार कार्ड संलग्न आहेत अशाच खात्यांमध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे आपले आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटशी जोडले गेले आहे की नाही याची खातरजमा करण्याचे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे.
आपण अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सिडेट आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. बँक खात्याला आधार सीडींग केलेले नसल्यास तात्काळ आपले खाते ज्या बँकेत आहे, अशा बँकेत जाऊन आधार जोडणी करून घ्यावी. डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब आवश्यक आणि अनिवार्य आहे. 31 ऑगस्ट पर्यंत या योजने लाभासाठी र्ज करण्याची मुदत आहे. 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज केला तरी सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलै 2024 पासून दरमहा पंधराशे रुपये लाभ मिळणार आहे.
एक जुलै ते 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थींना 17 ऑगस्ट रोजी थेट डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्याचा लाभ जमा होणार आहे. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी होऊन दुसऱ्या टप्प्यात लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना सूचना
नागरिकांना आवाहन करतानाच जिल्हा प्रशासनाने या कार्यात सहभागी असणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, गृहिणी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू बालवाडी सेविका, आशा सेविका, पर्यवेक्षिका, मदत कक्ष प्रमुख, या सर्वांना आवाहन केले आहे की, त्यांनी देखील ज्यांचे अर्ज नामंजूर असतील त्या सर्व लाभार्थ्यांची संपर्क करावा. त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी. पुन्हा ऑनलाईन जमा करावेत. ज्यामुळे लाभार्थ्यांना लाभ मिळेल. त्यामुळे ज्यांच्या त्रुटी असतील त्यांच्याशी संपर्क साधून त्रुटी दूर करण्यात यावी, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.