नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक पदावर अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे आणि हिंगोलीचे पोलीस अधिक्षक जी श्रीधर या दोघांना पुणे शहरात पोलीस उपआयुक्त या पदाव पाठविले आहे. नांदेडचे माजी पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांना भविष्यातील पोलीस बनविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्यांची नियुक्ती प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे करण्यात आली आहे. सोबतच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह तीन पोलीस अधिक्षकांच्या नियुक्त्या प्रतिक्षेत ठेवण्यात आल्या आहेत.
राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेल्या आदेशात राज्यातील 12 भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना नविन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यात नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना नांदेडचे पोलीस अधिक्षक केले आहे. नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे आणि हिंगोलीचे पोलीस अधिक्षक जी श्रीधर आणि गोंदियाचे पोलीस अधिक्षक निखील पिंगळे या तिघांना पोलीस उपआयुक्त पुणे शहर येथे पाठविले आहे. नांदेड जिल्ह्याचे माजी पोलीस अधिक्षक आणि पुणे शहरातील पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांना भविष्यातील पोलीस घडविण्याची महत्वपुर्ण जबाबदारी देवून शासनाने त्यांना प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे नियुक्ती दिली आहे. पोलीस उपआयुक्त ठाणे शहर विनयकुमार राठोड यांना पोलीस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) येथे नियुक्ती दिली आहे. नांदेड येथील माजी अपर पोलीस अधिक्षक आणि सध्या पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेशन विभाग अमरावती अविनाश बारगळ यांना पोलीस अधिक्षक बीड या पदावर पाठविले आहे. पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक ठाणे येथील मोहन एम.दहीकर यांना पोलीस उपआयुक्त ठाणे शहर येथे नियुक्ती दिली आहे. पोलीस अधिक्षक/ दक्षता अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथील दिगंबर प्रधान यांना पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई येथे नियुक्ती दिली आहे. पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई अससलेले प्रकाश बी.जाधव यांना सहाय्यक पोलीस महानिरिक्षक नियोजन व समन्वय महाराष्ट्र राज्य मुंबई येथे नियुक्ती दिली आहे. नागपुर शहरातील पोलीस उपआयुक्त गोरख सुरेश भामरे यांना पोलीस अधिक्षक गोंदिया या पदावर पाठविले आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 नागपुर येथील समादेशक प्रियंका नारनवरे यांना पोलीस अधिक्षक लोहमार्ग नागपुर येथे नियुक्ती दिली आहे.
या आदेशात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नंदकुमार ठाकूर आणि मनिष कलवाणीया या तिघांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश काढण्यात येतील असे लिहिले आहे.
अभिनंदन अबिनाशकुमारजी
आपल्या भारतीय पोलीस सेवेतील कामाची सुरूवात केल्यानंतर अपर पोलीस अधिक्षक पद नांदेडला भुषवणारे अबिनाशकुमार यांच्या नावाची व्याख्या काही अक्षरात करता येणार नाही. तरी पण त्यांचे नाव म्हणजेच नशिब असे आम्हाला म्हणायचे आहे. नशिबाने दाखवलेली कमाल आणि त्यांच्यावर शासनाने दाखवलेला विश्र्वास यामुळेच त्यांना महाराष्ट्रात भुभागाप्रमाणे दुसऱ्या क्रमांकावर असलेला जिल्हा म्हणजे नांदेड येथे पोलीस अधिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्या कर्तत्वाने इतरांची मने जिंकण्याचा त्यांच्या नावात प्रभाव आहे. गेली दोन वर्ष ते योगेश्र्वर अर्थात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासोबत नांदेड जिल्हा सांभाळत होते. यामुळे पोलीस अधिक्षक पदाची जबाबदारी सांभाळतांना ते नक्कीच कर्तृवान ठरतील. वास्तव न्युज लाईव्ह परिवार अबिनाशकुमार यांना “गरीबांचे, गरजवंतांचे अश्रु पुसण्यासाठी आपले बाहु बळकट राहावे’ असे शब्द जोडून शुभकामना प्रेषित करीत आहे.