नांदेड(प्रतिनिधी)-आंबेगाव ता.हिमायतनगर येथील एका शेताची फेरफार नक्कल देण्यासाठी 6 वर्षापुर्वी हिमायतनगर येथील महिला लिपीकाने स्विकारलेल्या लाचेसाठी भोकर विशेष न्यायाधीश वाय.एच.खरादी यांनी महिला लिपीकाला 2 वर्षाचा कारावास आणि 4 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
एका 63 वर्षाच्या तक्रारदाराने सन 2016 मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती की, शेत गट क्रमांक 225 च्या फेरफार झालेल्या कागदपत्रांची नक्कल देण्यासाठी हिमायतनगर तहसील कार्यालयातील लिपीक सुनिता दत्तात्रय गोपेवाड या लाचेची मागणी करत आहेत. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे लावलेल्या सापळ्यात सुनिता दत्तात्रय गोपेवाड (तेंव्हा वय 36) हिस लाच घेतांना रंगेहात पकडले.त्यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरिक्षक बळवंत पेडगावकर यांनी लोकसेविका सविता दत्तात्रय गोपेवाड विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
या प्रकरणात झालेले साक्षीपुरावे, तोंडी जबाब या आधारावर न्यायाधीश खरादी यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 13 प्रमाणे दोन वर्षाच कारावास 3 हजार रुपये रोख दंड आणि कलम 7 नुसार एक वर्षाचा कारावास व 1 हजार रुपये दंड अशा दोन वेगवेगळ्या शिक्षा दिल्या. सुनिता गोपेवाड यांना दोन्ही शिक्षा एकत्र भोगायचा आहेत. दंड भरला नाही तर तीन महिन्याचा अतिरिक्त वाढीव कारावासाची शिक्षा निकाल पत्रात नमुद आहे. भोकर न्यायालयातील हा विशेष खटला क्रमांक 2/2016 मध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड.अनुराधा डावखरे यांनी बाजू मांडली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने पोलीस निरिक्षक जमीर नाईक आणि पोलीस अंमलदार प्रदीप कंधारे यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणताही लोकसेवक, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
*अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड*
*दुरध्वनी – 02462 – 253512*
*श्री प्रशांत पवार, पोलीस उप अधीक्षक,*
*मो.नं. 9870145915*
*टोल फ्रि क्र. 1064*