पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना संलग्न करण्याची कायदेशीर तरतूद नाही

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना संलग्न करण्याची कोणतीही कायदेशीर व प्रशासकीय तरतूद नाही असा खुलासा अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी राज्यभरातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना पाठविलेल्या पत्रानंतर झाला आहे.
सध्या काही महिन्यांमध्ये राज्यातील लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालक कार्यालय, परिक्षेत्रीय कार्यालय आणि पोलीस अधिक्षक कार्यालय स्तरावर या बदल्या झाल्या आहेत. तरी पण त्यातील काही लोक अद्यापही कार्यमुक्त करण्यात आलेले नाहीत. या संदर्भाने अपर पोलीस महासंचालक (का व सु) संजय सक्सेना यांनी 29 जुलै रोजी जारी केलेल्या पत्रात या सर्व बदली झालेल्या अधिकारी व पोलीस अंमलदारांना बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
संजय सक्सेना यांनी लिहिलेल्या या पत्रानुसार पोलीस महासंचालक कार्यालयाच्या असे निदर्शनास आले आहे की, घटकप्रमुख(पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक) आणि परिवेक्षीय अधिकारी (परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरिक्षक) हे अधिकारी अनेक कारणास्तव(ही कारणे लिहायची ताकत असतांना सुध्दा हिम्मत नाही) त्यांच्या घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बदलीच्या ठिकाणावरून इतर ठिकाणी संलग्न(ऍटच) करतात.
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना बदली झाल्यानंतर इतर ठिकाणी संलग्न करण्याबाबतची कोणतीही कायदेशीर व प्रशासकीय तरतूद नसल्यामुळे या पुढे बदली झालेल्या अधिकारी व पोलीस अंमलदारांना कोणत्याही इतर ठिकाणी संलग्न करण्यात येवू नये. या पत्रात अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी पोलीस महासंचालकांच्या मान्यतेनंतर घटक प्रमुखांना आदेश दिले आहेत की, बदली झालेल्या पण संलग्न असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांचा आढावा घेवून त्वरीत मुळ बदली ठिकाणी त्यांना हजर होण्याचे निर्देश द्यावे ही कार्यवाही पुढील पाच दिवसात पुर्ण होईल याची वैयक्तीक दक्षता घेण्यास सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!