नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन घरीफोडी प्रकरणाचे गुन्हे हिमायतनगर पोलीसांनी उघडकीस आणले आहेत. त्यात पोेलीसांनी 1 लाख 4 हजार 600 रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त केला आहे. 22 वर्षीय युवकाने एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला सोबत घेवून या घरफोड्या केल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 20-21 जुलैच्या रात्री सिध्देश्र्वर शंकरराव कदम यांचे शटर तोडून त्यातून 36 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्यासंदर्भाने गुन्हा क्रमांक 192/2024 दाखल केला होता. तसेच दुसऱ्या एका चोरीमध्ये एकूण 81 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. त्या संदर्भाने हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुप्न्हा क्रमांक 193/2024 दाखल होता. हिमायतनगर पोलीसांनी पोलीस निरिक्षक अमोल भगत, सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कोमल कागणे, पोलीस अंमलदार शामसुंदर नागरगोजे, पवन चौदंते आदींनी या प्रकरणाचा माग काढला तेंव्हा शामसुंदर मारोती बनसोडे (22) या युवकाने या चोऱ्या केल्याचे त्यांना समजले. शामसुंदर बनसोडेला पकडले असता पोलीसांना प्राप्त झालेल्या अतिरिक्त माहितीनुसार त्याने विधीसंघर्षग्रस्त बालकाला सोबत घेवून या चोऱ्या केल्या आहेत. पोलीसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकाला सुध्दा ताब्यात घेतले आहे. झालेल्या दोन चोऱ्यांमध्ये एकूण 1 लाख 17 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यापैकी हिमायतनगर पोलीसांनी 1 लाख 4 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरट्यांकडून जप्त केला आहे. कौशल्यपुर्ण कामगिरी करून चोरट्यांना पकडणाऱ्या हिमायतनगर पोलीसांचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी कौतुक केले आहे.