नांदेड(प्रतिनिधी)-एका सहाय्यक पोलीस निरिक्षकाने कशाच्या तरी प्रभावाखाली रेल्वे स्थानकावर घातलेल्या हुज्जतीनंतर तेथे मोठाच तमाशा झाला. पण पोलीस दप्तरी या सहाय्यक पोलीस निरिक्षकांना वाचविण्यात आले.
आज दुपारी 3.30 वाजता नांदेड ते पुणे जाणाऱ्या गाडीने छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी मन्याड खोऱ्याच्या पोलीस ठाण्यात कार्यरत एक सहाय्यक पोलीस निरिक्षक नांदेडच्या रेल्वे स्थानकावर आले. दरम्यान रेल्वे स्थानकाच्या फलाटावर सफाई कर्मचाऱ्यांसोबत एपीआय साहेबांचा वाद झाला. या वादात रेल्वे पोलीस धावून आले. एपीआय साहेब साध्या कपड्यात असल्यामुळे आणखी जास्तच गडबड झाली. अखेर एपीआय साहेबांनी आपला परिचय दिला. तोपर्यंत रेल्वे स्थानकात होत असलेल्या चर्चेनुसार वेगवेगळ्या भरपूर चर्चा होत आहेत. पण वाद झाला हे मात्र नक्की.
रेल्वे पोलीसांनी त्यांना आपल्या पोलीस ठाण्यात आणले तेंव्हा एपीआय साहेब माझ्याविरुध्द केस करता काय? करा, तुम्हाला भी दाखवतो मी काय चिज आहे असे बोलत आपल्या मोबाईलवरून त्यांच्या बॅचमेंटच्या गु्रपवर रेल्वे पोलीस मला मारत आहेत असा संदेश टाकल्याची महिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे नांदेड शहरात असलेले त्यांचे बॅचमेंट अत्यंत जलदगतीने रेल्वे स्थानकात धावले. बॅचमेंटला त्यांचा प्रभाव माहितीच होता. त्यामुळे त्यांनी रेल्वे पोलीसांची समजूत काढून त्यांना परत घेवून गेले. दरम्यान एपीआय साहेबांनी नांदेडमध्ये नुकत्याच आलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला सुध्दा फोनवरुन आपल्याला मारहाण होत असल्याची माहिती सांगितली. या बाबतचा व्हिडीओ सुध्दा रेल्वे पोलीसांमधील एका पोलीस अंमलदाराने बनवला आहे. परंतू तो व्हिडीओ उपलब्ध झाला नाही. बहुदा आपलाच साहेब आहे म्हणून त्या पोलीस अंमलदाराने कानावर हात ठेवले असतील.
ज्या पोलीस विभागातील अधिकाऱ्यांकडे पाहुन समाज आपली दिशा ठरवतो त्याच पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन केल्यानंतर त्यांच्याकडून काय बोध घ्यावा हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. या संदर्भाने कोणतीही नोंद कोठेच झाल्याची नसल्याची माहिती आहे. पण प्रकार घडला आहे. तो रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आला असेल, रेल्वे स्थानकावरील पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आला असेल हे मात्र नक्की. एपीआय साहेब कोणत्या प्रभावात होते. याबाबीला मात्र कोणीच दुजोरा दिला नाही. पण सांगणारे सांगत होते की, ते प्रभावाखाली होते.