नांदेड(प्रतिनिधी)-पावसाळा सुरू होवून दोन महिन्याच्या जवळपास होत असतांनाही दमदार पाऊस अद्यापही झाला नाही. मागील दोन दिवसापासून नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पावसाने हजेरी लावली आणि याच पावसाने विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पात मागील दहा दिवसांपासून पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. 35 टक्के पाणी साठा असलेल्या प्रकल्पात पुर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे दि.25 रोज गुरूवारी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास एक दरवाजा उघडून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. याचबरोबर गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याचेही दोन गेट उघडण्यात आले आहेत. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी प्रकल्प आता 100 टक्के भरला असल्याने आता तरी नांदेडकरांना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा. सध्या सहा दिवसांआड नांदेडकरांना पाणी मिळत आहे. महापालिका प्रशासनाने याची तात्काळ दखल घेवून नांदेडकरांना पावसाळ्यात दिलासा देण्यात यावा अशी मागी आता नांदेड्या जनतेतून समोर येत आहे.