वाहतुक पोलीसांना मोबाईलमध्ये वाहन चालकांचे फोटो काढता येत नाहीत

नांदेड(प्रतिनिधी)-माहितीच्या अधिकारात वाहतुक परिमंडळ लकडगंज, नागपूर शहर येथील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी दिलेल्या उत्तरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे वाहतुक पोलीसांद्वारे मोबाईल फोनने फोटो काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता नाही असे उत्तर देण्यात आले आहे. परंतू आजही सर्रास वाहतुक पोलीस राज्यभर आपल्या मोबाईलद्वारे वाहन चालकांचे फोटो काढून त्यांच्यावर दंड प्रस्तावित करतात. आज कोट्यावधी रुपयांचा दंड प्रलंबित आहे.
नागपूर येथील तिलक खंगार यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाहतुक परिमंडळ लकडगंज, नागपूर शहर यांना माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारला होता की, वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे वाहतुक पोलीसांद्वारे मोबाईल फोनमध्ये फोटो काढण्यात वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता आहे किंवा कसे याबाबत माहिती मिळावी. यामध्ये या प्रश्नाचे उत्तर देतांना वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाहतुक परिमंडळ लकडगंज नागपूर शहर यांनी 20 जुलै 2024 रोजी दिलेल्या उत्तरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींचे वाहतुक पोलीसांद्वारे मोबाईल फोन ने फोटो काढण्यास वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता नाही असे उत्तर देण्यात आले आहे.
या उत्तराच्याविरुध्द राज्यभर असे दिसते की, वाहतुक पोलीस वाहन चालक पुढे गेल्यावर सुध्दा पाठीमागून त्याच्या गाडीच्या क्रमांकासह फोटो घेतात आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम टाकून ती संकेतस्थळावर अपलोड करतात. असे झाल्याबरोबर वाहनधारकाने परिवहन कार्यालयात नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर किती दंड लावण्यात आला याचा संदेश येतो. तो दंड लवकर भरला नाही तर पुढे कुठे वाहनाची तपासणी झाली तर त्या वाहनाला वाहतुक पोलीसांनी पहिले लावलेला दंड भरला नाही तर मुक्त करत नाहीत. म्हणूनच म्हणतात ना पोलीस खाते करील ते होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!