नांदेड(प्रतिनिधी)-आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेला दुचाकीवर चक्कर मारुन आणतो म्हणून घेवून जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न चार गुरूजींनी थांबवला. त्या प्रकरणातील युवकाला विशेष पोक्सो न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंड अशी कठोर शिक्षा ठोठावली आहे.
किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका वडिलांच्या तक्रारीप्रमाणे 10 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी ते आणि त्यांची पत्नी मिळून शेतात कामासाठी गेले होते. शेताजवळ असणाऱ्या रस्त्यावर त्यांची आठ वर्षाची बालिका 6 वर्षाचा बालक आणि 3 वर्षाचा बालक रस्त्यावर खेळत असतांना सतिश व्यंकटी जवादे हा युवक आला आणि त्याने 8 वर्षीय बालिकेला दुचाकीवर बसून घेतले. ही बाब 6 वर्षाच्या बालकाने आपल्या आई-वडीलांना सांगितली की, दीदी दुचाकीवर चक्कर मारायला गेली आहे. आपला शेताचा शेजारी आहे म्हणून वडीलांना काही वाटले नाही. परंतू त्यांच्या गावाजवळच्या घाटातून दोन दुचाकींवर चार शिक्षक परत येत असतांना त्यांना बालिकेच्या रडण्याचा आवाज आला आणि ते तेथे थांबन पाहणी करत असतांना रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात सतिश व्यंकटी जवादे त्या बालिकेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता. शिक्षकांना पाहुन सतिश जवादे पळून गेला. शिक्षकांनी बालिकेची विचारपुस करून तिला आपल्या दुचाकीवर आई-वडीलांकडे आणले आणि घडलेला प्रकार सांगितला. गावातील लोकांनी सतिश व्यंकटी जवादेला पकडून पोलीस ठाणे किनवट येथे नेले आणि त्याच्याविरुध्द तक्रार करण्यात आली. पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आणि सतिश व्यंकटी जवादेला अटक झाली. पोलीस उपनिरिक्षक एम.डी. राठोड यांनी सतिश व्यंकटी जवादे विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
हा खटला विशेष खटला क्रमांक 123/2021 प्रमाणे न्यायालयात चालला. त्यात सहा साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. उपलब्ध झालेल्या पुराव्याच्या आधारावर न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी सतिश व्यंकटी जवादेला एक वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील एम.ए.बत्तुल्ला(डांगे) यांनी बाजू मांडली. किनवट येथील पोलीस अंमलदार विजय वाघमारे आणि नितीन भालेराव यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्णपणे केले.