नांदेड- आर्थीकदृष्टया दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्ग तसेच इतर मागास वर्ग या प्रवर्गातील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात 50 टक्के ऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थींनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाने सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा 8 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानीत अशासकीय महाविद्यालये, अंशत: अनुदानीत (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानीत महाविद्यालये,तंत्र निकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभीमत विद्यापीठे (खाजगी अभीमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहायीत विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठे अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायीक अभ्यासक्रमास, शासनाच्या सक्षम प्राधिकारामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रकियेद्वारे (Centralized Admission Process – CAP ) (व्यवस्थापन कोटयातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून) व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थीकदृष्टया दुर्बल घटकातील (EWS), इतर मागास प्रवर्गातील (OBC), सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास प्रवर्गातील (SEBC) मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 100 टक्के सवलत देण्यात आलेली आहे. उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या (नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली) विद्यापीठ/महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक, उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड यांच्यातर्फे करण्यात आले आहे.