मालपाणी मतिमंद विद्यालयात शिक्षक-पालक अभिमुखता बैठकीस प्रतिसाद
नांदेड (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकच नव्हे तर सामुहिक प्रयत्नाची गरज असल्याचे प्रतिपादन राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी केले आहे.
शहराच्या मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात शनिवार दि. 20 जुलै रोजी जय वकील फाउंडेशनच्या दिशा प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक-पालक अभिमुखता बैठकीत डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजितकौर जज, मुख्याध्यापक नितिन निर्मल, संजय शिंदे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. बजाज म्हणाले की, मुलामध्ये असणाऱ्या नैसर्गिक उर्जेला दिशा देण्याचे काम करण्यासाठी पालक व शाळेत समन्वय असणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या अडचणी व समस्यांची माहिती शिक्षकांना सांगित्यास या समस्येचे निराकरण करण्याचा निश्चित प्रयत्न होईल यासाठी शिक्षकांशी पालकांनी समन्वय ठेवावा असे आवाहन केले आहे.
याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजितकौर जज यांनी दिव्यांगांसाठीच्या योजना, कायदेविषयक अधिकार आदिबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रवेशावेळी विद्यार्थ्याचा बुध्यांक, आवड, त्याला येणाऱ्या समस्या जाणून घेवून वर्षभर या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठीचा टास्क मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी यावेळी स्पष्ट करत निरामया योजनेच्या लाभासाठी दिव्यांग मुलांच्या पालकांना शून्य बॅलंसवर बॅंकेत खाते उघड्यास अडचण येवू नये यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा अग्रणी बॅंकेमार्फत जिल्ह्यातील सर्व बॅंक व्यवस्थापकास निर्देश दिल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मुरलीधर गोडबोले यांनी मानले. यानंतर शिक्षक व पालकात थेट संवाद साधण्यात आला. यावेळी शिक्षकांनी दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत पालकांचे समुपदेशन केले. यावेळी गणेश धुळे, डॉ. मनीषा तिवारी, संजय रुमाले, मधुकर मनुरकर, मुरलीधर गोडबोले, आनंद शर्मा, संगीता नरवाडे, अजय पावडे, किरण रामतिर्थे, अविनाश सुरणर, भीमराव दहीकांबळे, संजय पोताने, जिजाबाई खरटमोल, नंदादेवी चंदे आदींची उपस्थिती होती.