नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात खरेदी केलेल्या दागिण्यांवर शिक्का मारणे गरजेचे असते असे सांगून एका महिलेची फसवणूक करत त्यांनी खरेदी केलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि मंगळसूत्र असा 60 हजार रुपयांचा ऐवज एका भामट्याने लंपास केला आहे.
कलावतीबाई रघुनाथ निलमवार (60) रा.नरंगला रोड देगलूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता एक व्यक्तीच्या त्यांच्याकडे आला आणि मी सोन्या-चांदीचे दुकानदार महेबुब साहिब यांचा पुतण्या आहे असे सांगितले. तुम्ही खरेदी केलेल्या दागिण्यांवर शिक्का मारावा लागतो म्हणून त्यांचा विश्र्वास संपादन करून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिणे व एक मंगळसुत्र असा 60 हजार रुपयांचा ऐवज या चोरट्यांने लंपास केला आहे. देगलूर पोलीसांनी ही घटना भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(2), 319(2) नुसार गुन्हा क्रमांक 293/2024 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक फड अधिक तपास करीत आहेत.