नांदेड,(प्रतिनिधी)-काल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये पाकीटमारांनी अनेक खिशांवर हात फिरवला असून 65 हजार रुपयांची चोरी केली आहे.एका सोन्याच्या कारागिराला मध्यरात्री थांबवून त्याच्याकडून 13 लाख 88 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेल्याचा प्रकार इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. कामाजीवाडी ता.देगलूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 62 हजार 400 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
दि.8 जुलै रोजी नांदेड शहरातून राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणासाठी रॅली निघाली होती. या रॅलीमध्ये असलेल्या भरपूर गर्दीचा फायदा पॉकीट मारांनी घेतला. तक्रारदार गणेश बालाजी डुमणे यांच्यासह शंकर भिमराव लांबदाडे यांच्या खिशातून अनुक्रमे 25 हजार आणि 40 हजार रुपयांच्या पॉकीटांवर खिसेकापूंनी हात साफ केला आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 296/2024 नुसार दाखल केली ून पोलीस अंमलार गजानन किडे अधिक तपास करीत आहेत.
शेख सैदुल अब्दुल सोबान मुळ राहणार लखनपुर ता.जंगीपुर जि.हुबळी सध्या राहणार सैदान मोहल्ला नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 जुलैच्या मध्यरात्रीनंतर 12.25 वाजता ते आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 सी.एफ.2161 वर बसून सैदान मोहल्ला जवळ आले असतांना बबुजान मस्जिद गल्लीतल्या रोडवरील खड्याजवळ दोन जणांनी त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्या दुचाकीसह डिक्कीत असलेली 13 लाख 68 हजार रुपये किंमतीच्या सोन्याची बॅग असा एकूण 13 लाख 88 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. इतवारा पोलीसांनी हा घटनाक्रम भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4), 3(5) प्रमाणे गुन्हा क्रमांक 242/2024 प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
कामाजी वाडी ता.देगलूर येथील रविंद्र बाबु इरसुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जुलैच्या रात्री 1 ते पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून कामगारांच्या वेतनासाठी ठेवलेली रोख रक्कम 27 हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 62 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मरखेल पोलीसांनी हा घटनाक्रम भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(4) आणि 305 नुसार गुन्हा क्रमांक 151/2024 प्रमाणे दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे अधिक तपास करीत आहेत.