नांदेड,(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी आणि त्यांच्या पत्नी विरुद्ध आपल्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 69. 21% अपसंपदा जमवल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा दाखल केला आहे. एकूण रुपयांच्या आकड्यांमध्ये हा अपसंपदेचा आकडा 58 लाख 97 हजार 287 एवढा होतो.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्वप्नाली गंगाधर धुतराज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वर्ग 3 चे सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक आणि तालुका कृषी अधिकारी धर्माबाद दीपक शंकरराव हनवते कोळीकर (60)आणि त्यांची पत्नी अपर्णा दीपक कोळेकर (50) राहणार रायगड नगर नांदेड या दोघांच्या संदर्भाने 10 फेब्रुवारी 2000 ते 10 फेब्रुवारी 2021 दरम्यान उघड चौकशी करण्यात आली. या संदर्भाने त्यांच्याकडे सर्व चौकशी झाली तेव्हा त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ते योग्य देऊ शकले नाहीत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संपत्तीबाबत योग्य पुरावे दाखल करू शकले नाहीत. त्यात त्यांनी एकूण 58 लाख 97 हजार 247 रुपयांची अपसंपदा म्हणजेच दीपक हनवते यांच्या कायदेशीर उत्पन्नापैकी 69 2 टक्के बेहिशोबी मालमत्ता त्यांच्याकडे सापडली आहे. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील विविध कलमानुसार पोलीस ठाणे विमानतळ येथे गुन्हा क्रमांक 205/ 2024 दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप अधिक्षक राजेंद्र पाटील, प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रीती जाधव तपास करणार आहेत.
प्रतिबंधक विभागाने ही अपसंपदेची माहिती देताना जनतेला आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी अपसंपदा संपादित केल्याबद्दल खात्रीलायक माहिती असल्यास तसेच लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी व्यक्ती (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून घेण्यात देण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त अन्य रक्कम अर्थात लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 02462- 253512 आणि टोल फ्री क्रमांक 1064 अपसंपदा आणि भ्रष्टाचार संदर्भाची माहिती द्यावी.