नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या पंतप्रधान मोदी सभा मैदानाजवळ तीन जणांनी एका युवकाची दुचाकी बळजबरीने पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. तसेच हिमायतनगरच्या बैल बाजारात तीन जणांनी एक मोबाईल बळजबरीने चोरला आहे आणि पाळा ता.मुखेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 42 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
विक्रम जळबाजी वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जून रोजी रात्री 8.30 वाजता ते मोदी सभा मैदानाजवळ आपली दुचाकी उभी करून पायी वॉकींग करत असतांना शेख आवेज शेख अफजल (23), शेख सलमान शेख सलीम (23) आणि सोफियान खान युसूफ खान पठाण (23) या तिघांनी त्यांना खंजीरचा धाक दाखवून त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.व्ही.2093 किंमत 60 हजार रुपयांची बळजबरीने चोरून नेली आहे. नांदेड ग्रामीण पेालीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 515/2024 नुसार दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गायकवाड हे करणार आहेत.
दुसऱ्या एका घटनेत बैलबाजार हिमायतनगर येथे अरविंद मारोती सावतने हे 21 जून रोजी सायंकाळी 6 वाजता थांबले असतांना ोल मेटकर, गोविंद, परमेश्र्वर आणि पिराजी पवार या तिघांनी त्यांच्या खिशातील 10 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीसांनी हा जबरी चोरीचा गुन्हा क्रमांक 142/2024 नुसार दाखल केला असून महिला पोलीस उपनिरिक्षक कदम अधिक तपास करीत आहेत.
पाळा ता.मुखेड येथील नागनाथ बापुराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 जून रोजी मध्यरात्रीनंतर उकाड्यामुळे ते आणि त्यांचे कुटूंबिय गच्चीवर झोपले असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश मिळवून लोखंडी कपाट तोडले आणि त्यातून सोन्याची अंगठी 10 हजार रुपयांची, मनी मंगळसुत्र 20 हजार रुपये किंमतीचे आणि रोख रक्कम 12 हजार असा 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 195/2024 नुसार दाखल केला असून पोलीस अंमलदार धोंडगे अधिक तपास करत आहेत.