40 तोळे सोने आणि 22 लाख रुपये रोख रक्कमेचा दरोडा टाकणारे सहा जण नऊ दिवसात जेरबंद

75 टक्के ऐवजाची जप्ती ; स्था.गु.शा.ची कार्यवाही
नांदेड(प्रतिनिधी)-15 जून रोजी कौठा ता.कंधार येथे दरोडा टाकून 40.7 तोळे सोन्याचे दागिणे आणि 22 लाख रुपये रोख रक्कम लुटणाऱ्या सहा गुन्हेगारांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने 9 दिवसात गजाआड केले आहे. याप्रकरणी पोलीसांच्या माहितीनुसार चार आरोपी अजून फरार आहेत. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
15 जून रोजी मध्यरात्रीनंतरच्या 3 वाजेच्यासुमारास मौजे कौठा ता.कंधार येथे गजानन श्रीहरी येरावार यांच्या घरात 6 दरोडेखोर घुसले. त्यांनी तलवारीचा आणि घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्या घरात मोठी लुट केली. या लुटीमध्ये 40.7 तोळे सोन्याचे दागिणे आणि 22 लाख रुपये रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटून नेली होती. या प्रकरणी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या पोलीस अंमलदारांना मार्गदर्शन करून महाराष्ट्रातील परभणी, जालना, बुलढाणा आदी जिल्ह्यासह गुजरात राज्यात पाठविले होते. पोलीसांनी केलेल्या मेहनतीला 9 व्या दिवसात यश आले आणि त्यांनी 6 गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून दरोड्यातील जवळपास 75 टक्के ऐवज जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षकांनी श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्वांनी कट रचून, रेकी करून हा दरोडा टाकला होता. हा दरोडा टाकण्याअगोदरच लुटीच्या रक्कमेतील वाटप ठरले होते. दरोडेखोरांना मिळालेल्या माहितीनुसार 4 ते 5 कोटी रुपयांचा ऐवज येरावार यांच्या घरात सापडेल. परंतू तसे काही घडले नाही आणि या सर्व दरोडेखोरांनी लुटलेल्या ऐवजाची वाटणी वाटूर फाटा जिल्हा जालना येथे केली आणि सर्व आप-आपल्या रितीने निघून गेले.
पोलीसांनी पकडलेले सहा आरोपी सोनुसिंग बलविरसिंग भोंड(22) रा.उदनानगर सुरत गुजरात, जयसिंग शेरासिंग बावरी (20) रा.दंतेश्र्वर संतोष वाडी बडोदा (गुजरात), अरुण नागोराव गोरे (45) रा.उस्माननगर ता.कंधार जि.नांदेड, शेख खदीर मगदुमसाब (50) रा.इकबालनगर धनेगाव नांदेड, राजासिंग हिरासिंग टाक (22), रा.अण्णाभाऊ साठेनगर जिंतूरनगर परभणी, गुरमुखसिंग हिरासिंग टाक (25) रा.नवा मोंढा परभणी असे आहेत. यांच्यासोबत दरोडा टाकतांना सतबिरसिंघ बलवंतसिंघ टाक रा.अकोला, जसपालसिंग हरीसिंग जुन्नी रा.परतूर जि.जालना, राजपालसिंग दुधाणी रा.सिंदखेड राजा जि.बुलढाणा, सरदार खान समीरउल्ला खान रा.पुसद जि.यवतमाळ आणि मोन्टासिंग रा.धुळे अशा 11 जणांनी मिळून केला आहे. पकडलेल्या सहा आरोपींकडून 405 ग्रॅम सोन्याचे दागिणे, 55 ग्रॅम चांदीचे दागिणे व रोख रक्कम 8 लाख 50 हजार असा एकूण गुन्ह्यातील दरोडा टाकलेल्या ऐवजापैकी 29 लाख 43 हजार 461 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली चार चाकी गाडी 5 लाख रुपयांची आणि 3 मोबाईल फोन 45 हजार रुपयांचे असा एकूण इतर 5 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पकडलेल्या सहा गुन्हेगारांना पुढील तपासासाठी कंधार पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिखक संतोष शेकडे, रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, साईनाथ पुयड, मिलिंद सोनकांबळे हे सर्व उपस्थित होते. गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *