दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात जय्यत तयारी  

· श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन येथे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

· नागरिकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा लाभ घ्यावा    

नांदेड – ‍जिल्हा प्रशासनाच्यावतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार 21 जून, 2024 रोजी सकाळी 6.30 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन एनआरआयच्या बाजुस हिंगोली गेट नांदेड येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हयातील विविध योग समिती, योग प्रशिक्षक, आयुष मंत्रालयाचे प्रतिनिधी, यांच्यावतीने सदरील कार्यक्रमास मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्हयातील नागरीकांनी 21 जुन रोजी सकाळी 6.15 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन, एनआरआयच्या बाजुस हिंगोली गेट नांदेड येथे उपस्थित राहुन आंतरराष्ट्रीय योग दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

हा कार्यक्रम 21 जुन रोजी सकाळी 6.30 ते 8 वाजेदरम्यान सामुहिक योगा कार्यक्रमाअंतर्गत प्रार्थना चल क्रिया व खडे आसान, बैठे आसन, पोटावरचे आसन व पाठीवरचे आसन, प्राणायम ध्यान शांतिपाठ इत्यादी योग क्रिया घेण्यात येणार आहेत. योग दिन हा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा करण्यासाठी शासकीय विविध विभागातील सर्व कर्मचारी, आरोगय विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, सर्व शैक्षणिक संस्था, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा पुरस्कारार्थी, खेळाडू व मागदर्शक, स्कॉऊट गाईड, एन.एस.एस., एन.सी.सी., योग संघटना इत्यादी विभागाचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

 

नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरीष्ठ महाविद्यालय, ग्रामपंचायतच्यावतीने गावातील सर्व नागरीकांनी कमीतकमी 50 च्या गटामध्ये एकत्र येऊन 21 जुन 2024 रोजी सकाळी 7 ते 8 या कालावधीत योगाचे आयोजन करण्यात यावे.

 

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत सविस्तर माहिती www.ayush.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच नांदेड जिल्हायातील नागरीकांनी आपआपल्या संस्थेत, शाळेत, कार्यालयात, मोठ्या प्रमाणात योग दिनाचे आयोजन करून 7517536227 या भ्रमणध्वनीवर किंवा dsonanded.dsys-mh@gov.in, dsonanded@rediffmail.com या ई-मेलवर फोटोसह कार्यक्रम आयोजनाचा संपुर्ण अहवाल सादर करावा, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सुचित केले आहे.

 

केंद्र शासनाने 21 जून 2024 हा दिवस 10 वा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिले असून संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगादिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. योगा दिनाच्या निमीत्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे, ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण, योगा हा आपल्या भारताच्या सांस्कृतीक वारसाचा अविभाज्य भाग आहे.

 

जिल्हा प्रशासन नांदेड, शिक्षण विभाग (जिल्हा परिषद, नांदेड), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड, नांदेड जिल्हा योग संघटना व योग विद्येचा प्रचार-प्रसार करणाऱ्या स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजनाची पूर्व तयारी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली.

 

या बैठकीस जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्य.) माधव सलगर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभर, ने.यु.कें. जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंदा रावळकर, जिल्हा संघटक गाईड श्रीमती शिवकाशी तांडे, संजय बेतीवार क्रीडा अधिकारी, राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंडेकर, बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, टी. एन. रामनबैनवाड नांदेड जिल्हा योग असो. आदि मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर गजानन हुगे (प्रतिनिधी, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन,नांदेड), आर. डी. केंद्रे (योग विद्या धाम), सुरेश येवतीकर (योग विद्या धाम), प्रलोभ कुलकर्णी (क्रीडा भारती),गंगाबिशन कांकर (गिता परिवार),किशन रंगराव भवर (प्रतिनिधी, क्रीडा भारती), राम शिवपनोर (भारत स्वाभिमान न्यास, पतंजली), सुरेश लंगडापुरे (पतंजली योग समिती), नागोराव पोटबदवार (सचिव योग विद्याधाम नांदेड), डॉ. अवधूत पवार (इंटरनॅशनल नॅपरोपॅथी ऑर्गनायझेशन,नांदेड), बालाजी लंगडापुरे (आय.एन.ओ. जिल्हा संघटक नांदेड), एस.गंगाधर पाटील (आय.एन.ओ. सचिव, नांदेड), शिवा बिरकले (आर्ट ऑफ लिव्हींग), शिवाजीराजे पाटील (आर्ट ऑफ लिव्हींग) आदी उपस्थित होते.

 

हा कार्यक्रम आयोजन-नियोजनासाठी बैठकीमध्ये कामकाज वाटप करण्यात आले असून याबाबत जय्यत तयारी सुरु आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!