नांदेड(प्रतिनिधी)-वसमत तालुक्यात राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेला नांदेडमध्ये आणून एका लॉजवर तिच्यावर अनेकवेळेस अतिप्रसंग केलेल्या 24 वर्षीय युवकाला विशेष न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
कुरूंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार तिला लग्नाचे आमिष दाखवून सुनिल विश्र्वनाथ बेले (24) या युवकाने 7 वेळेस नांदेडला आणले आणि नांदेडमधील कुणाल डिलेक्स लॉज येथे थांबून वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या रुममध्ये अत्याचार केला. हा घटनाक्रम जून 2023 ते जून 2024 दरम्यान घडला. अत्याचार करतांनाचे व्हिडीओ तयार करून या युवकाने त्या बालिकेवर त्या व्हिडीओचे धाक दाखवून अनेकदा अत्याचार केले. सोबतच व्हिडीओ व्हायरल करतो म्हणून तिच्याकडून पैशांची मागणी केली. कुरूंदा पोलीसांनी हा गुन्हा शुन्य क्रमांकाने दाखल करून घटनास्थळ नांदेड शहरातील पोलीस ठाणे वजिराबादच्या हद्दीत असल्याने गुन्हा तपासासाठी वजिराबाद पोलीसांकडे वर्ग केला.
नांदेडच्या वजिराबाद पोलीसांनी कुरूंदा पोलीसांनी पाठविलेला गुन्हा आपल्याकडे 264/2024 नुसार दाखल कला. ज्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 376, 376(2)(एन), 506 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 4, 6, 8 आणि 12 जोडण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक मारोती फड यांच्याकडे देण्यात आला.
मारोती फड यांनी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारा त्या अत्याचाराचे व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या सुनिल विश्र्वनाथ बेले (24) यास अटक केली. आज न्यायालयात हजर करून 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी या प्रकरणात पोलीस कोठडी देणे आवश्यक असल्याचे मुद्दे मांडले. न्यायाधीश आर.एम. पांडे यांनी पोलीसांची विनंती दोन दिवसासाठी मान्य करत 20 जून 2024 पर्यंत अत्याचार करणाऱ्या युवकाला पोलीस कोठडीत पाठविले आहे.