नांदेड(प्रतिनिधी)- पाणी मागण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दुहेरी खून करणाऱ्या आरोपीला किनवट पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
आंबडी ता.किनवट येथे शेख वसीम महेबुब कुरेशी (22) हा युवक उत्तम गणपत भरणे यांच्या घरी बांधकाम सुरू असल्याने तेथे काम करण्यासाठी गेला होता. शेख वसीमने पिण्यासाठी पाणी मागितले आणि त्यावरून बांधकाम ज्या घराचे चालू आहे. त्या घराचा मालक उत्तम गणपत भरणे (52) यांच्यात वाद झाला तेंव्हा उत्तम भरणेने फावड्याने त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याच्या घराच्या शेजारी राहणारी महिला विशाखा भारत मुनेश्र्वर (53) ही शेख वसीमला वाचविण्यासाठी आली तेंव्हा तिलाही उत्तम भरणेने मारहाण केली. शेख वसीम जागीच मरण पावला होता. विशाखा मुनेश्र्वरला उपचारासाठी आदिलाबादला पाठविण्यात आले होते. परंतू ती उपचारादरम्यान मरण पावली.
शेख वसीम मरण पावल्यानंतर त्याच्या नातलगानी ते प्रेत पोलीस ठाणे किनवट येथे आणून ठेवले. जमलेल्या जमावाला पोलीस निरिक्षक बिर्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शांत करून पुढील कायदेशीर कार्यवाही करत मोबीन कुरेशी महेबुब कुरेशी यांच्या तक्रारीवरुन उत्तम भरणे विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नसार गुन्हा क्रमांक 140/2024 दाखल केला आहे. आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीसांनी आरोपी उत्तम गणपतराव भरणेला ताब्यात घेतले आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक देविदास चोपडे हे करत आहेत.