नांदेड(प्रतिनिधी)-निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या कुटूंबियांना खोटे बोलून फसवणूक करून त्यांच्या खात्यातून ऑनलाईन रक्कमा गायब होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपसंचालक निवृत्ती वेतन संचालनालय, लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई येथील अधिकारी संगिता जोशी यांनी सर्व जिल्हा कोषगार अधिकाऱ्यांना प्रसिध्द पत्रक काढून निवृत्ती वेतन धारक आणि कुटूंब निवृत्ती वेतन धारकांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील काही कोषागारातून निवृत्ती वेतन/ कुटूंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतन धारकांना अज्ञात व्यक्तींकडून संपर्क साधला जात आहे. ती अज्ञात व्यक्ती निवृत्ती वेतन धारकांना आपणास सुधारीत निवृत्ती वेतनाची परत रक्कम मिळणाकर आहे. पण त्या अगोदर तुमची वसुली काढली जाणार आहे. ती वसुलीची रक्कम तात्काळ ऑनलाईन भरावी जेणे करून तुमची फरक रक्कम मिळेल. काही निवृत्ती वेतन धारकांनी यावर विश्र्वास ठेवला आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यावर विश्र्वास ठेवून आपल्याकडे न निघणारी वसुलीची रक्कम भरली आणि ते फसले.
उपसंचालक संगिता जोशी यांनी राज्यभरातील कोषागार अधिकाऱ्यांना सुचित केले आहे की, त्या बाबत त्यांनी जनजागृती करावी. त्यांच्या आदेशानुसार कोषागार कार्यालय लाभ प्रदान करतांना किंवा वसुली करतांना फोनवरून कधीच संपर्क साधत नाही. या दोन्ही परिस्थितीमध्ये कोषागार कार्यालयांमार्फत लेखी स्वरुपात पत्र व्यवहार होतो. तेंव्हा निवृत्ती वेतनधारक आणि कुटूंब निवृत्ती वेतनधारकांनी अशा कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणताही ऑनलाईन व्यवहार करू नये. नाही तर आपली फसवणूक होईल