नांदेड शहरास पाणी पुरवठा करणे ही महापालिकेची प्राथमिकता-मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे

नांदेड(प्रतिनिधी)- सध्या उन्हाळ्याचे दिवस असुन नांदेड शहरास व मनपा हद्दीतील लोकवस्तींना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करणे हे महानगरपालिकेचे आद्यकर्तव्य असुन धरणामध्ये पाण्याची कमतरता असतांना अशा टंचाईच्या काळात नांदेड शहराच्या लगत असलेल्या महसुली गावांना महापालिकेने पाणी पुरवठा करणे म्हणजे हा शहरवासीयांवर अन्याय होईल असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
काही दिवसांपुर्वी विष्णुपुरी प्रकल्पा लगत महापालिकेच्या कोटीतीर्थ पंप हाऊस येथे दिनांक 1 मे 2024 च्या मध्यरात्री कोटीतीर्थ पंप हाऊस ते काबरा नगर जलशुध्दीकरण केंद्रा पर्यंत जाणारी मुख्य जलवाहीणी कोटीतीर्थ पंपींग स्टेशनच्या समोरच फुटली होती. नांदेड शहरास होणाऱ्या एकुण पाणी पुरवठ्यापैकी जवळपास 90% पाणी पुरवठा या जलवाहीणीवरुन केल्या जातो. सदरील जलवाहीणी जुनाट व जीर्ण झाल्यामुळे तसेच जलवाहीणी खालील कॉकेट खाली दबल्या गेल्यामुळे संपूर्ण जलवाहीणी जमिनीमध्ये खोलवर रुतल्या जाऊन पंप हाऊस मधील सर्व मशीनरीज ही उखळली होती.
या मुख्य जलवाहीणीच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिका प्रशासनाने दिनांक 02 मे 2024 पासुन हाती घेतले होते. सदरील मुख्य जलवाहीणी पुर्वपदावर बसविण्यासाठी टप्याटप्याने काम करुन दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले साहित्य नाशिक, मुंबई, हैद्राबाद, कलकत्ता ईत्यादी ठिकाणाहुन मागविण्यात आले होते. उखळलेली मुख्य जलवाहीणी व मशिनरीज दुरुस्त करण्याचे काम महानगरपालिका प्रशासना कडुन युध्दपातळीवर पूर्ण करुन नांदेड शहरास दिनांक 10 मे 2024 पासुन टप्या-टप्याने पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे.
वास्तविक पाहता वाडी गावचा पाणी पुरवठा हा थकीत पाणी पट्टी करापोटी बंद केलेला नसुन वरील प्रमाणे पंपींग स्टेशन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्या तेव्हा पासुन बंद आहे. या तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणी पुरवठा अद्याप पुर्ववत झालेला नाही. त्यातच काळेश्वर पंपींग स्टेशन येथील दोन पंप ना-दुरुस्त झाल्याने त्यात आणखी भर पडली आहे. महानगरपालिकेची सुध्दा आर्थिक परिस्थिती चांगली नसुन पाटबंधारे विभाग व महावितरणचे थकीत देयकामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. महाराष्ट्र शासन महापालिकेच्या जी.एस.टी. अनुदानातुन विष्णुपुरी प्रकल्पाची व उर्ध्व पैनगंगा (इसापुरची) थकीत पाणीपट्टी कपात करण्याच्या तयारीत असुन त्यामुळे महानगरपालिकेला आर्थिक नियोजन करणे गरजेचे झाले आहे.वाडी ग्राम पंचायतीकडे आजमितीस जवळपास 4.5 कोटी पाणी पट्टीची थकबाकी असुन ही रक्कम टप्या- टप्याने भरुन घेण्यास महापालिका प्रशासन अनुकुल असुन त्यासोबतच प्रत्येक महिण्याचे देयक सुध्दा अदाई होणे आवश्यक आहे. परंतु, नांदेड शहरास पाणी पुरवठा करणे ही महापालिकेची प्राथमिकता असुन टंचाईच्या काळात मनपा हद्दी बाहेर सवलतीत व कमी पैशात पाणी पुरवठा करणे म्हणजे शहरवासीयांवर अन्याय केल्या सारखे होईल असे प्रतिपादन मनपा आयुक्तांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *