नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक रस्त्यावर मद्य सेवन करून इतरांना त्रासा देणाऱ्या 127 व्यक्तीविरुध्द पोलीस विभागाने कार्यवाही केली आहे. यामुळे मद्यपिनो सावधान रस्त्यावर दारु पिऊ नका असेच म्हणावे लागेल.
दि.14 मे रोजी सायंकाळी विशेष मोहिम राबवून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेच्या तीन पथकांसह शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील पथकांनी सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, बिअर बारसमोर, हॉटेलसमोर, देशी दारु दुकानांसमोर मद्य सेवन करणारे आणि मद्य सेवन करून गोंधळ घालणारे तसेच असभ्य वर्तन करणाऱ्याा एकूण 127 लोकांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
पोलीसांनी जारी केलेल्या प्रेसनोटनुसार नांदेड शहरातील सर्व देशी व विदेशी दारु विक्री करणारे दुकान मालकांना कळविण्यात आले आहे की, आपल्या दुकानासमोर रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणीही व्यक्ती मद्य सेवन करणार नाही आणि मद्य सेवन करून असभ्य वर्तन करणार नाही. अशी घटना निदर्शनास आल्यास संबंधीत दुकान मालकाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे नमुद केले आहे.